घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांची पोलीस स्थानकावर धाव, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाईंनी काढली संतप्त लोकांची समजूत, संशयित आरोपीस अटक
सांगे : सांगे तालुक्यातील दाबामळ येथे एका 30 वर्षीय महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न करण्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी घडला. त्यानंतर सांगे पोलीस स्थानकावर गावच्या लोकांनी गर्दी केली. याची कल्पना मिळताच मंगळवारी रात्री सांगेचे आमदार आणि समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगे पोलीस स्थानकावर भेट देऊन पोलीस आणि ग्रामस्थ, पीडित महिला, तिचे नातेवाईक यांच्याशी बातचित करून आढावा घेतला. यावेळी त्यांनी पोलिसांना आवश्यक सूचना केल्या. तसेच ग्रामस्थांना पोलीस योग्य ती कारवाई करतील असे सांगितले. मंगळवारी सायंकाळी शेळपे येथील औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत काम आटोपून घरी परत येताना एका महिलेला वाटेत गाठून बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्याची धक्कादायक घटना घडली होती. तिने प्रतिकार केल्यावर तिला जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेचा आढावा घेतल्यानंतर माहिती देताना मंत्री फळदेसाई यांनी सांगितले की, पोलिसांनी पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करून घेतली आहे. तिला दुखापत झाली आहे. हा बलात्काराचा प्रयत्न असून पोलीस योग्य दिशेने तपास करत आहेत तसेच संशयित आरोपीला अटक करण्यात आलेली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
कंपनीच्या आवारातून अटक
पीडीत महिलेवर बलात्कार आणि हल्ल्याचा प्रयत्न करणारा संशयित घटनास्थळावरून तत्काळ फरार झाला होता. पोलिसांना प्रथम संशयित आरोपीचे नाव श्याम एवढेच मिळाल्याने त्यांनी इतर पोलीस स्थानकांत चौकशी केली असता पुष्टी मिळाली होती. त्यानंतर पोलीस श्याम याच्या करमणे येथील घरी गेले. तेथे त्यांना तो सहा दिवस झाले, तरी घरी न आल्याचे कळले. तो कंपनीच्या आवारातच राहत होता. त्यानंतर कंपनीच्या आवारात येत असताना त्याला अटक करण्यात आली. त्याने गुन्हा केल्याचे पोलिसांसमोर मान्य केले असल्याची माहिती मिळाली आहे.
महिलेवर पाळत ठेवून होता संशयित
मिळालेल्या माहितीनुसार, श्याम हा रोजंदारीवर सदर कंपनीत एका कंत्राटादारामार्फत गवंडीकाम करत होता. मंगळवारी सायंकाळी तो व त्याचे साथीदार दारू पिण्यास बसले होते. श्याम हा मध्येच उठून गेला होता. तो पीडित महिलेच्या पाळतीवर होता. ती ज्या वाटेने घरी जात होती तेथे तिला गाठून त्याने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. हा भाग जंगलमय असून पीडित महिलेने यावेळी प्रतिकार केला. त्यात त्यांची झटापट झाली. तिला मारण्यासाठी त्याने दगडही फेकला, पण नेम चुकल्याने ती बचावली, अशी माहिती मिळाली आहे. त्याचवेळी तेथे अन्य एक इसम आल्याने श्याम पळून गेला, असे सांगण्यात आले.
गुन्हेगारी पार्श्वभूमी
पोलिसांनी त्याच्याबरोबर काम करणाऱ्या तीन कामगारांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांनी संशयित आरोपिची ओळख पटविली आहे. सुऊवातीला वातावरण तणावाचे होते. मात्र मंत्री फळदेसाई पोलीस स्थानकात दाखल झाल्यावर ते निवळले. संशयित आरोपीचे नाव श्याम देविदास असे आहे. त्याची गुन्हेगारी स्वरुपाची पार्श्वभूमी आहे, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण गावस यांच्या मार्गदर्शनखाली उपनिरीक्षक रामचंद्र नाईक पुढील तपास करत आहेत. संशयिताला लवकरच न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
गावकऱ्यांकडून सुरक्षेची मागणी
गावात हा प्रकार कळल्यानंतर प्रथम गावच्या लोकांनी सांगे आरोग्य केंद्र व त्यानंतर सांगे पोलीस स्थानकात गर्दी करून संशयित आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर संशयिताला अटक करून पोलीस स्थानकात आणण्यात आले. शेळपे येथे मोठ्या प्रमाणात परप्रांतीय काम करत असून रात्री 12 वा. कामावरून सुटल्यावर अक्षरश: मोठा आवाज करत गावात हिंडत असतात. त्यामुळे गावच्या लोकांना सुरक्षा देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. या लोकांना सुऊवातीला पोलीस निरीक्षक नसल्याने उपनिरीक्षक रामचंद्र नाईक यांनी समजावण्याच्या प्रयत्न केला. तसेच रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवू, असे सांगितले.