अनेक भागातील वीजपुरवठा खंडित : केरी येथे घर कोसळले,गांजे येथील पाणी प्रकल्प यंत्रणा पाण्याखाली
वाळपई : सत्तरी तालुक्यात आज दिवसभर पडलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक वेळा वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. अनेक घरांवर झाडे कोसळली. विजेचे अनेक खांब तुटले आहेत. यामुळे अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला आहे. रात्री आठ वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झालेला नव्हता. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. होंडा पंचायत क्षेत्रातील भुईपाल भागामध्ये गेल्या तीन दिवसापासून वीजपुरवठा खंडित झालेला आहे. त्यामुळे या भागातील जनता संतप्त बनलेली आहे. वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे पाणीपुरवठा खंडित होत आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी भागातील ग्रामस्थांनी केलेली आहे. दरम्यान स्थानिक पंच स्मिता मोटे यांनी भुईपाल भागातील खंडित वीज समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. सालेलीत खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करीत असून आमदार डॉ देविया राणे यांनी याची दखल घेण्याची मागणी होत आहे.
केरी येथील घरावर झाड करून नुकसान
केरी येथील मठवाडा भागातील आझाद करोल यांच्या घरावर सागाचे झाड पडल्यामुळे घराच्या छपराची नुकसानी झाली. तसेच घरातील सामानाची नुकसानी झाली. हे कुटुंब गरीब असल्याने सरकारने दखल घेऊन आर्थिक मदत करावी, अशी मागणी करोल कुटुंबियांनी केली आहे. दरम्यान, आमदार डॉ देविया राणे यांना याबाबत माहिती दिली असून त्यांच्याकडून करोल कटुंबाला निश्चितच मदत मिळेल, अशी आशा उस्मान यांनी व्यक्त केली आहे.
रस्ते पाण्याखाली, बागायतीत पाणी
गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस लागत असल्यामुळे सत्तर तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. मात्र कोणत्याही ठिकाणी वाहतूक ठप्प झालेले नाही .मंगळवारी रात्री मात्र मुसळधार पाऊस लागत होता. रगाडा नदी तुडंब भरून पाणी काठावरील बागायतीत पाणी घुसले. यामुळे बागायतीची काही प्रमाणात नुकसानी झाली.
गांजे येथील पंप हाऊस कोसळले
गांजे या ठिकाणी 10 कोटी खर्चून सांखळी मतदारसंघातील काही भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. मात्र विषेश म्हणजे, गेल्या रविवारीच त्याचे उद्घाटन झाले होते. अवघ्या दोन दिवसांनी या प्रकल्पाचे पंपहाऊस कोसळले. यामुळे नागरिकांनी या कामाच्या दर्जा संदर्भात सवाल उपस्थित केला असून याची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. या घटनेमुळे सांखळी मतदारसंघातील आंबेशी, पाळी आदी भागांमध्ये पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
आमोणा वीज केंद्रात बिघाड
आमोणा येथील वीज केंद्रावर बिघाड झाल्यामुळे दुपारी तीन वाजल्यापासून सत्तरी तालुक्याच्या 70 टक्के भागांत वीजपुरवठा खंडित झाला आहे. दरम्यान, आमोणा वीज केंद्रातील बिघाडाबाबत दुपारी तीन वाजल्यापासून दुऊस्तीचे काम हाती घेतले आहे. रात्री आठ वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होणार असल्याचे वाळपई वीज कार्यालयाचे सहाय्यक अभियंता दीपक गवस यांनी स्पष्ट केले.
वीज खांब कोसळले
बुधवारी वादळीवाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे नगरगाव पंचायत, ठाणे पंचायत, म्हाउस पंचायत अशा अनेक ठिकाणी वीज वाहिन्यावर झाडे पडून खांबही तुटून पडले. यामुळे वीजपुरवठा खंडित झालेला आहे. अनेक भागातील वीजवाहिन्यांवरील झाडे हटविण्यात आलेली आहेत. यामुळे रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा पूर्वपदावर येण्याची आशा अभियंत्यांनी व्यक्त केलेली आहे.









