मडगाव : अंबाजी-फातोर्डा येथे अमूल आईस्क्रीम पार्लर जवळ रस्त्यावर झाड पडून या ठिकाणी पार्क केलेली एक टाटा इंडिका आणि ज्युपिटर स्कूटर यांची सुमारे 20 हजार रूपयांची हानी झाली. मडगाव अग्नीशामक दलाने सुमारे 2 लाख रूपयांची मालमत्ता वाचविण्यात यश मिळविले. ही घटना सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. सांकवाळ येथील मेटास्ट्रिप कंपनी समोरील राष्ट्रीय महामार्गावर जंगली झाड उन्मळून पडले. ही घटना पहाटे 4 वाजता घडली. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. हेच झाड जर सकाळी पडले असते तर भयानक परिस्थिती उद्भवली असती. या महामार्गावर सातत्याने वाहनांची वर्दळ असते. वेर्णा अग्नीशामक दलाने हे झाड हटवून रस्ता मोकळा केला. फातोर्डा पोलीस स्टेशन जवळच्या रस्त्यावर सागवानाचे झाड पडले. हे झाड मडगाव अग्नीशामक दलाने हटविले. तसेच सोनसोडो, राय येथील कचरा प्रकल्पाजवळ रस्त्यावर पडलेले झाड ही मडगाव अग्नीशमन दलाने हटविले. कुठ्ठाळी जंक्शनजवळ रस्त्यावर बुधवारी दुपारी झाड पडले. मात्र, कोणताच अनुचित प्रकार घडला नाही. हे झाड वेर्णा अग्नीशमन दलाने हटविले. कामुर्ली येथील सेंट सेबॅस्टियन चॅपलजवळ रस्त्यावर आणि कंपाउंडवर पडलेले झाड ही अग्नीशमन दलाने हटविले. त्यात विशेष अशी हानी झाली नाही. सांतेमळ-राय येथे शेड व शौचालयावर जंगली झाड पडून हानी झाली.
मडगावात दरड कोसळी
दरम्यान, संततधार पावसामुळे लोहिया मैदानाजवळील टेकडीचा काही भाग कोसळला, त्यामुळे येथील दामोदर चेंबर्स कॉ-ओप. सोसायटी आणि परिसरातील इतर इमारतींना धोका निर्माण झाला आहे. या टेकडीचे आणखी नुकसान टाळण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना आखाव्यात अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.









