मालिकेत ‘क्लीन स्वीप’ करण्याचे कर्णधार रोहित शर्मासमोर लक्ष्य
वृत्तसंस्था/ पोर्ट ऑफ स्पेन
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा व शेवटचा कसोटी सामना आज गुरुवारपासून सुरू होत असून त्यात कमकुवत वेस्ट इंडिजला नमवून मालिकेत ‘क्लीन स्वीप’ करण्याचे लक्ष्य भारतीय संघासमोर, तर आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द वाढवण्याच्या दृष्टीने चांगली खेळी करण्याचे लक्ष्य अजिंक्य रहाणेसमोर असेल. हा सामना दोन्ही संघांमधील 100 वा कसोटी सामना असून भारताचा कर्णधार रोहित शर्माने हा एक मोठा क्षण असल्याचे म्हटले आहे.
रोहितच्या नेतृत्वाखालील संघाने डॉमिनिकामध्ये झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजवर जसे वर्चस्व गाजवले होते तसेच या सामन्यातही गाजविण्याची अपेक्षा बाळगली जात आहे. क्वीन्स पार्क ओव्हलवरील या सामन्यानंतर भारत पुढील कसोटी डिसेंबर-जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर खेळणार आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघ निवडताना आपल्याकडे दुर्लक्ष करणे अत्यंत कठीण बनवण्याच्या दृष्टीने रहाणेसमोर ही आणखी एक संधी आहे.

18 महिन्यांतील आपल्या पहिल्या कसोटीत म्हणजे गेल्या महिन्यात झालेल्या जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रहाणे हा भारताचा उत्कृष्ट फलंदाज ठरला होता. परंतु डॉमिनिकामधील संथ आणि चेंडू फिरणाऱ्या खेळपट्टीवर त्याने मिळालेली संधी वाया घालवली. त्यात तिथे भारतीय संघाला फक्त एकदाच फलंदाजी करावी लागली. दुसऱ्या कसोटी सामन्यातही भारताला एकदाच फलंदाजी करावी लागण्याची दाट शक्यता आहे. शिवाय पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर सावरणारा श्रेयस अय्यर दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी उपलब्ध होण्याची अपेक्षा असल्याने रहाणेला संघातील स्थान टिकविण्याच्या बाबतीत त्याच्याशी स्पर्धा करावी लागणार आहे.
फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोडने दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर भारताला फॉर्मात असलेल्या रहाणेची गरज भासेल, असे सांगितले. तंत्राचा विचार करता तुम्ही सतत त्यावर काम करत असता. पण रहाणेच्या बाबतीत माझ्यासाठी वेगळी बाब ठरली ती ही की, त्याच्या दृष्टिकोन खूपच शांत होता. तो उशिरापर्यंत चेंडूची वाट पाहून आणि शरीराच्या जवळ खेळत होता. तो अजूनही जाळ्यामध्ये तशीच फलंदाजी करत आहे. आम्हाला आशा आहे की, तो चांगली कामगिरी करेल. दक्षिण आफ्रिकेतील परिस्थिती पाहता त्याच्यासारखा कोणी तरी हवा, असे राठोडने म्हटले आहे.
पहिल्या कसोटीत तीन दिवसांत एक डाव आणि 141 धावांनी विजय मिळविल्यानंतर भारतीय संघामध्ये कोणतेही मोठे बदल अपेक्षित नाहीत. परंतु डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनादकटला आणखी संधी मिळते का हे पाहणे बाकी आहे. 31 वर्षीय उनादकट 13 वर्षांतील आपली फक्त तिसरी कसोटी विंडीजमध्ये खेळला. पण तो असा एकमेव भारतीय गोलंदाज राहिला ज्याला डॉमिनिकामध्ये एकही बळी मिळाला नाही आणि त्याने केवळ नऊ षटके टाकली.
रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या भारताच्या फिरकी जोडीने मालिकेच्या सुऊवातीच्या सामन्यात मिळालेल्या फिरकीस पोषक खेळपट्टीचा व्यवस्थित लाभ उठविला होता. आता वेस्ट इंडिजने अष्टपैलू रॅमन रेफरच्या जागी फिरकी टाकणारा अष्टपैलू खेळाडू केविन सिंक्लेअरचा समावेश केल्याने दुसऱ्या कसोटीतही खेळपट्टी फिरकीस पोषक राहण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास भारताला उनादकटच्या ऐवजी अक्षर पटेलच्या रूपाने आणखी एक फिरकीपटू खेळवण्याचा मोह होईल. शार्दुल ठाकूरला बसवूनही अक्षरला सामावून घेतले जाऊ शकते. अक्षरच्या फलंदाजीत गेल्या 12 महिन्यांत झपाट्याने सुधारणा झाली आहे.
पदार्पणात 150 हून अधि धावा काढणारा तिसरा भारतीय ठरलेला यशस्वी जैस्वाल हा आपला फॉर्म कायम राखण्याचा प्रयत्न करेल. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला शुभमन गिल पहिल्या कसोटीत केवळ 11 चेंडूच टिकू शकला आणि तो मध्यफळीत चांगली कामगिरी करून दाखविण्यास उत्सुक असेल. डिसेंबर, 2018 पासून परदेशात कसोटी शतक झळकावता न आलेल्या विराट कोहलीचे पहिल्या कसोटीत 76 धावा केल्यानंतर मोठी खेळी करण्यावर लक्ष असेल.
कसोटी क्रिकेटमधील पहिल्या धावेसाठी 20 चेंडू घेतलेल्या इशान किशनने पदार्पणातच अश्विन आणि जडेजा यांच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षण करताना दाखविलेल्या कौशल्याने कर्णधाराला प्रभावित करून सोडले आहेत. आता तो मध्यफळीत येऊन आपले फलंदाजीतील कौशल्य दाखविण्याच्या दृष्टीने आतुरतेने वाट पाहत असेल. दुसऱ्या बाजूने नवोदित अॅलिक अॅथनेझ वगळता वेस्ट इंडिजचा कोणताही फलंदाज उच्च दर्जाच्या फिरकीला सहज तोंडू देऊ शकलेला नाही आणि जर चेंडू डॉमिनिकाप्रमाणे वळू लागला, तर त्यांना पुन्हा निश्चित संघर्ष करावा लागेल. वेगवान गोलंदाजीला मदत करणारी खेळपट्टी राहिल्यास केमार रोच आणि अल्झारी जोसेफ यांच्या समावेशामुळे वेस्ट इंडिजची स्थिती चांगली बनू शकते. भारतीय फलंदाजीवर दबाव आणायचा झाल्यास हा त्यांच्यापुढील एकमेव मार्ग आहे.
संघ : भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे, के. एस. भरत, इशान किशन, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनादकट, नवदीप सैनी.
वेस्ट इंडिज: क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), जर्मेन ब्लॅकवुड, अॅलिक अॅथनेझ, टी. चंदरपॉल, रहकीम कॉर्नवॉल, जोशुआ दा सिल्वा, शॅनन गॅब्रियल, जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, किर्क मॅकेन्झी, केविन सिंक्लेअर, केमार रोच, जोमेल वॅरिकन.
सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 पासून









