बेंगळूरमध्ये पाच संशयित दहशतवाद्यांना अटक : सीसीबी पोलिसांची कारवाई : कारागृहातच मिळाले प्रशिक्षण
प्रतिनिधी/ बेंगळूर
बेंगळूर शहरालाच टार्गेट बनवून विध्वंसक कृत्ये घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा मोठा कट बेंगळूरच्या केंद्रीय गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (सीसीबी) उधळून लावला आहे. शहरातील विविध ठिकाणी स्फोट घडविण्याचा कट रचणाऱ्या पाच संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. अटकेतील आरोपींना कारागृहातच प्रशिक्षण मिळाल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. या कारवाईमुळे बेंगळूर दहशतवाद्यांचे आश्रयस्थान असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

संशयित दहशतवाद्यांच्या हालचालींविषयी गुप्तचर विभागाने माहिती दिली होती. या माहितीच्या आधारे सीसीबी पोलिसांनी सापळा रचून संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध दहशतवाद प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी त्यांना एनआयए न्यायालयात हजर केले असता 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सुहेल, उमर, जाहीद, मुदासिर आणि फैजल रब्बानी अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ते सर्वजण बेंगळूरमधील रहिवासी असल्याचे समजते. त्यांना आर. टी. नगर, हेब्बाळ, डी. जे. हळ्ळी येथून अटक करण्यात आली. सदर कारवाईविषयी बेंगळूर शहर पोलीस आयुक्त बी. दयानंद यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
संशयितांकडून 7 गावठी पिस्तूल, 42 जिवंत काडतुसे, 4 ग्रेनेड, 4 वॉकीटॉकी, 2 सॅटेलाईट फोन, 2 ड्रॅगर व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. प्रमुख आरोपी जुनैद अहमद हा फरार आहे. तर टी. नासीर हा बॉम्बस्फोटप्रकरणी कारागृहात आहे. जुनैद याच्याविरुद्ध खून, रक्तचंदनाची चोरटी वाहतूक, दोन दरोडे असे एकूण चार गुन्हे नोंद आहेत. तोच या प्रकरणातील मास्टरमाईंड असून अटकेतील संशयित दहशतवाद्यांना अर्थपुरवठा करत होता. या प्रकरणात आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे. आरोपींना पिस्तूल, जिवंत काडतुसे, ग्रेनेड कोठून मिळाले, याविषयी तपास सुरू आहे.
2008 मधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख दहशतवादी टी. नासीर आणि 2017 मधील अपहरण आणि खून प्रकरणातील प्रमुख आरोपी जुनैद या दोघांनीच बेंगळूरमधील विविध भागांमध्ये स्फोटाचा कट रचला होता, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
29 वर्षीय जुनैद आणि सहकाऱ्यांनी 2017 मध्ये 21 वर्षीय नूर अहमद या युवकाचे अपहरण करून खून केला होता. या प्रकरणी बेंगळूरच्या आर. टी. नगर पोलिसांनी जुनैद, सुहेल, मुदासिर, जावेद यांच्यासह 21 जणांना अटक केली होती. त्यांना कारागृह अधिकाऱ्यांनी दहशतवाद्यांसाठी असणाऱ्या कोठडीत ठेवले होते. कारागृहात असतानाच जुनैदने बॉम्बस्फोटातील आरोपी नासीर याच्या मदतीने आपल्या टीमला दहशतवादी कृत्याविषयी प्रशिक्षण दिले होते. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर जुनैदने आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी संपर्क साधून बेंगळुरात घातपाताचा कट करण्यास सुरुवात केली. दुबईतून अनेक श्रीमंतांकडून पैसे मिळवून तो अटकेतील आरोपीच्या बँक खात्यावर जमा करत होता. याविषयी गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे सीसीबी पोलिसांनी कारवाई केली.
खून प्रकरणात शिक्षा झालेल्या पाच जणांनी कारागृहातून बाहेर पडताना बेंगळूर शहरात घातपात घडविण्याचा संकल्प केला होता. त्यांना या कृत्यासाठी आमिष दाखविण्यात आले होते. एका संघटनेच्या हॅन्डलरच्यावतीने प्रशिक्षण घेतलेल्या हे सर्वजण बेंगळूर शहरातील विविध भागात भाडोत्री घरात वास्तव्यास होते. या सर्वांचे दहशतवादी संघटनांशी संपर्क असल्याची माहितीही पोलिसांच्या हाती लागली आहे.
बेंगळूर शहरच टार्गेट
दहशतवादी संघटनांकडून घातपाती कारवायांविषयी माहिती मिळविणाऱ्या या टोळीने बेंगळूरमधील बीएमटीसीचे मुख्य बसस्थानक तसेच शहरातील इतर ठिकाणी स्फोट घडविण्यासाठी ‘रेकी’ केली होती. त्यासाठी आवश्यक व्यूहरचनाही केली होती. मात्र, बेंगळूर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे घातपाताचा मोठा कट उधळला गेला आहे.
राज्यभरात सतर्कता
बेंगळूरमध्ये पाच संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्यानंतर पोलीस खात्याला सतर्कतेच्या सूचना गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी दिली आहे. रेल्वेस्थानक, विमानतळ, बंदरे, बसस्थानके, लोकांची वर्दळ असणाऱ्या ठिकाणी सुरक्षेत वाढ करावी, अशी सूचना दिली आहे.









