वृत्तसंस्था / नवी दिल्ली
राष्ट्रीय पातळीवरील कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांना आगामी आशियायी क्रीडा स्पर्धेत चाचणी फेऱ्यांमध्ये भाग घेतल्याशिवायच प्रवेश देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र हा निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
अंतिम पनघळ आणि सुजीत कुमार या कुस्तीपटूंनी या निर्णयाला आव्हान देणारी याचिका बुधवारी सादर केली. क्रीडा स्पर्धांसाठी प्रवेश देताना सर्व खेळाडूंसाठी प्रक्रिया समान असावी. या प्रक्रियेतून कोणालाही सूट देण्यात येऊ नये. तसे केल्यास अन्य प्रतिभावंत खेळाडूंवर अन्याय होणार आहे, अशी भूमिका याचिकाकर्त्यांनी मांडली आहे. या याचिकेवर आज गुरुवारीच सुनावणी होत आहे.
विसंगती समोर
बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट या कुस्तीपटूंनी काही दिवसांपूर्वी सरकारविरोधात मोठे आंदोलन केले होते. खेळाडूंवर अन्याय होऊ नये आणि विशेषत: कनिष्ठ खेळाडूंना न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन आहे, असे पुनिया याने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. पण आता चाचणी फेऱ्यांमध्ये भाग न घेताच हे खेळाडू थेट प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. हा कनिष्ठ खेळाडूंवर अन्याय असून ज्येष्ठ खेळाडू त्यांच्याच प्रतिपादनाच्या विरोधात वागत आहेत, अशीही बाजू याचिकाकर्त्यांनी याचिकेत स्पष्ट केल्याची माहिती देण्यात आली.
हरवा आणि पुढे जा
ज्येष्ठ खेळाडूंनी चाचणी फेऱ्यांमध्ये कनिष्ठ खेळाडूंना हरविले, तर प्रश्नच उरणारी नाही. त्यांना उजळ माथ्याने आशियायी क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधीं न्यायोचित पद्धतीप्रमाणे मिळेलच. पण थेट प्रवेश दिल्यास त्यांच्यापेक्षाही प्रतिभासंपन्न असणाऱ्या कनिष्ठ खेळाडूंना विनाकारण संधी नाकारली जाईल. याचा त्यांच्या आत्मविश्वासावर परिणाम होऊन पर्यायाने खेळाचीच हानी होईल, असे अनेक मुद्दे कनिष्ठ खेळाडूंनी याचिकेत मांडले आहेत.









