अखेर लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी दोन परस्पर विरोधी तंबू तयार झाले. 2019 मध्ये जसे विरोधक विखुरले तसेच होणार असे वाटत असताना विरोधकांची एकजूट झाल्याचे स्पष्ट झाले. बंगळूरू येथील बैठकीपूर्वी आप पक्षाच्या मागणीला काँग्रेसने दिलेला सकारात्मक प्रतिसाद आणि त्यानंतर ‘आप‘ने सामील होण्याची केलेली घोषणा हा काँग्रेस आणि प्रादेशिक शक्तीच्या एकजुटीचा धागा दर्शवतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स अर्थात एनडीएमध्ये तब्बल 38 पक्ष असणार आहेत. या आघाडीचे हे जसे वैशिष्ट्या आहे तसेच यातील अनेक पक्ष फार मोठ्या क्षेत्रावर प्रभाव करणारे नाहीत. त्यामुळे या आघाडीवर संपूर्णपणे भाजपचा वरचष्मा असणार आहे. अनेक ठिकाणी विरोधकांना नामोहरम करण्यासाठी त्यांची मताची टक्केवारी मोदींना मदतीला येईल. या उलट इंडिया या लघुरूप नावाने स्थापन झालेल्या इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इनक्लुजिव अलायन्सचा आधार प्रत्येक राज्यातील मातब्बर पक्षांशी आघाडीचा आहे. मात्र यातील सहभागी पक्षांची मतांची टक्केवारी ही काँग्रेस पक्षाच्या बरोबरीची किंवा थोडीफार अधिकची आहे. मोदींचे मित्र हे तुलनेने छोटे आणि त्यामुळे सहज ऐकतील असे आहेत. फक्त त्यांची संख्या मोठी असल्याने वाजपेयी काळासारखी ‘लेकुरे उदंड जाहली…’ अशी स्थिती होऊ शकते. तर काँग्रेसच्या तुल्यबळ प्रादेशिक शक्तीमुळे साग्रसंगीत मानापमान रंगण्याचीही चिन्हे आहेत. निवडणुकीला आता एक वर्षापेक्षाही कमी कालावधी राहिला असताना तिकीट वाटपाच्या वेळेपर्यंत दोन्ही आघाड्यांमधील मित्रपक्ष कसा टिकाव धरतात त्यावर या आघाड्यांचे यश अवलंबून असेल.
मोदींच्या आघाडीत भाजपच्या 301 या प्रचंड खासदार संख्येनंतर सर्वात मोठा पक्ष असेल तो शिंदे शिवसेनेच्या तेरा खासदारांच्या गटाचा! या आघाडीत महाराष्ट्रातील एक खासदार असलेला राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शून्य खासदार असलेले रिपब्लिकन पक्ष आठवले, विनय कोरे यांचा जनसुराज्य, बच्चू कडू यांचा प्रहार आणि गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल, आसाममध्ये आसाम गण परिषद, तामिळनाडूतील एआयडीएमके या पक्षांसोबतच तब्बल 25 पक्षांचा एकही खासदार नाही. बिहारच्या लोक जनशक्ती पारस गटाच्या पाच खासदारांसह, 9 पक्षांचे एकच खासदार आहेत. एनडीएचे हे वास्तव असले तरी त्यांच्या आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा नरेंद्र मोदी हे आहेत. या विरोधात इंडिया आघाडीचा एकच एक चेहरा सांगणे मुश्कील आहे. आताच एखाद्या नेत्याच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार असे जाहीर केले तर ही आघाडी फुटण्याचा धोका आहे. त्यामुळे प्रत्येक जण सामूहिक नेतृत्वाचा मुद्दा पुढे करतील किंवा आपणच पंतप्रधान होणार अशा अविर्भावात वावरताना दिसतील. इंडिया आघाडीतील एक त्रुटी म्हणजे त्यांचा प्रमुख पक्ष असणारा काँग्रेस हा केवळ 49 खासदारांचा पक्ष आहे. तो भाजपपेक्षा तब्बल 252 इतक्या खासदार संख्येने कमी आहे. त्यांच्या आघाडीतील द्रमूक, तृणमूल यांचे अनुक्रमे 24 आणि 23, संयुक्त जनता दलाचे 16, ठाकरे शिवसेनेचे सहा, शरद पवारांचा राष्ट्रवादी, समाजवादी आणि नॅशनल कॉन्फरन्स, केरळ मुस्लिम लीग या पक्षांचे प्रत्येकी तीन खासदार आहेत. तर आम आदमी, झारखंड मुक्ती, केरळ काँग्रेस, एमडीएमके, आरएसपी यांचे एकेक खासदार आहेत. आपली भूमिका स्पष्ट न केलेले मात्र आपापल्या राज्यात प्रभाव असणारे वायएसआर काँग्रेस 22, बिजू जनता दल 12, बीआरएस 9 खासदारांच्या पक्षाने नेहमीच सत्ता जिकडे वळेल तिकडे आपले वजन टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आता कुठे दोन्ही बाजूच्या तंबूत कोण कोण उभे राहणार याचे चित्र स्पष्ट झाले आहे. 2019 मधील पुलवामा हल्ला आणि बालाघाट नंतर देशातील वातावरण बदलून गेले. त्यामुळे शून्य खासदार संख्येवर अनेक महत्त्वाचे पक्ष पोहोचले. यंदाच्या निवडणुकीत त्यांना संधी दिसते आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर कोणता मुद्दा भाजपकडून पुढे आणला जातो यावर अनेकांचे भवितव्य ठरेल. समान नागरी कायदा, राम मंदिर असे काही मुद्दे पुढे दिसत आहेत. मोदी विकासाच्या मुद्यावर आपली लाट बनवू शकले मात्र गेल्या निवडणुकीपर्यंत त्यांचा मुद्दाच कुठेतरी हरवला. अलीकडच्या काळात त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांनी आणि जागतिक पातळीवर त्यांच्या कामगिरीने त्यांची प्रतिमा उंचावली. युक्रेन-रशिया युद्धकाळात किंवा अफगाणिस्तानातील सत्ता बदलाच्या काळात मोदींना अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले. अलीकडच्या काळात रशियाबरोबरच्या तेल व्यापाराने आणि सौदी राष्ट्रांशी झालेल्या कराराने त्यांचे स्वत:चे वातावरण निर्माण झाले. दुसरीकडे विरोधी तंबूतील राहुल गांधी यांची खराब केलेली प्रतिमा आता धुवून गेली आहे. मोदींच्या चुकांवर बोट ठेवत त्यांनी ज्या शंका व्यक्त केल्या त्या खऱ्या ठरल्या आणि त्याचे फटके देशाला बसल्याने मोदींच्या विरोधात वातावरण होतानाच राहुल गांधी स्वत:ची प्रतिमा बनवू शकले. त्यांच्या पदयात्रेची प्रथम खिल्ली उडवण्यात आली मात्र नंतर हे प्रकरण जड जाणार असे भाजपच्या ध्यानात आले. मात्र त्यांना कोणत्याही कारणाने ती यात्रा रोखता आली नाही. त्याचे परिणाम जवळच्या निवडणुकीत झाले. कर्नाटकात तर चमत्कार घडला. आपल्यासमोर विरोधकच नाही असे म्हणणाऱ्या भाजपला कर्नाटकात मतदारांची दहशत बसली आहे. त्याचाच परिणाम म्हणून आपल्या मित्र पक्षांचा आकडा वाढवताना त्यांनी देशभरातील झाडून सारे काँग्रेस पासून दूर असणारे पक्ष आपल्यासोबत ओढून आणले आहेत. आपल्या राज्यात काँग्रेस नको असे म्हणणारे अनेक प्रादेशिक पक्ष आता काँग्रेसशिवाय उपाय नाही आणि त्यांची एकगठ्ठा मते असल्याशिवाय आपले महत्त्व उरणार नाही. 2024 मध्ये मोदी आले तर सर्वांना मोडून टाकतील असे सांगत मतदारांना एकगठ्ठा मते देण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. भाजप विरोधात एकास एक किंवा मैत्रीपूर्ण लढतीचे त्यांचे प्रयत्न आहेत. दुसरीकडे ‘अकेला मोदी विरोधी भ्रष्टाचारी’ हीच खेळी भाजप पुन्हा खेळते का आणि ती कितपत यशस्वी होते हे पाहणे औत्सुक्याचे आहे. पहिली सलामी तर झडली आहे. आता खेळ कसा रंगतो ते पहायचे.








