मुंबई :
अमेरिका आणि चीनसारख्या प्रमुख देशांमध्ये मागणी कमी झाल्यामुळे चालू आर्थिक वर्षामध्ये रत्ने आणि दागिन्यांची निर्यात घटणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. सदरची रत्ने आणि दागिन्यांची निर्यात 10 ते 15 टक्के इतकी घसरेल, असे मत रत्ने आणि दागिने निर्यात संवर्धन परिषदेचे अध्यक्ष विपूल शहा यांनी व्यक्त केले आहे.
आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये रत्ने आणि दागिन्यांची निर्यात वार्षिक आधारावर 2.48 टक्के वाढून 3 लाख 462.52 कोटी रुपयांची झाली आहे. वाणिज्य मंत्रालयाने 2023-24 आर्थिक वर्षासाठी निर्यातीचे लक्ष 42 अब्ज डॉलर्सचे ठेवले आहे. अमेरिका आणि चीन या दोन मोठ्या देशांमधून रत्ने आणि दागिन्यांची मागणी घटली आहे. वाढते व्याजदर, महागाई यामुळे ग्राहकांनी या क्षेत्राकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षामध्ये सदरच्या निर्यातीत 10 ते 15 टक्के घट होणार असल्याची शक्यता विपूल शहा यांनी बोलून दाखविली आहे.









