मृतांमध्ये 6 महिन्याच्या मुलाचा समावेश
वृत्तसंस्था/ जोधपूर
राजस्थानच्या जोधपूर येथे वैमनस्यातून एकाच कुटुंबातील 4 जणांची हत्या करत त्यांचे मृतदेह जाळण्यात आले आहेत. मारेकऱ्यांनी कुटुंबातील 6 महिन्यांच्या बाळालाही ठार केले आहे. बुधवारी सकाळी चारही जणांचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत घराच्या अंगणात आढळून आले आहेत. हत्येची घटना मंगळवारी रात्री सुमारे 3 वाजता घडली असावी असे पोलिसांनी सांगितले. कुटुंबातील लोक घराबाहेर झोपलेले असताना धारदार अस्त्राने गळा चिरून त्यांची हत्या करण्यात आली. यानंतर सर्वांचे मृतदेह अंगणात आणून पेटवून देण्यात आले.

या प्रकरणी तपासाकरता पोलिसांनी फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने पुरावे मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. संबंधित घरात 10 दिवसांपासून वीज नव्हती. याप्रकरणी त्यांनी विद्युत विभागाकडे तक्रारही केली होती. याचमुळे हे कुटुंब घराबाहेर झोपी गेले होते. प्रारंभिक तपासात ही हत्या जमीन वादातून घडल्याचे मानले जात आहे. चार जणांची हत्या झाल्याचे कळताच पोलीस महानिरीक्षक जयनारायण शेर आणि जिल्हाधिकारी हिमांशु गुप्ता यांनी घटनास्थळी धाव घेतली.









