एनडीए अन् ‘इंडिया’पासून राखणार अंतर :
►वृत्तसंस्था/ लखनौ
बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी बुधवारी मोठी घोषणा केली आहे. आमचा पक्ष पंजाब आणि हरियाणात प्रादेशिक पक्षांसोबत काही अटींसह आघाडी करत निवडणूक लढविणार आहे. तर राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये बसप स्वबळावर निवडणूक लढविणार आहे. तसेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीकरता बसप कुठल्याही पक्षासोबत आघाडी करणार नसल्याचे मायावती यांनी स्पष्ट केले आहे.
एकीकडे सत्तारुढ पक्ष म्हणजेच भाजप आपणच सत्तेवर येणार असल्याचा दावा करत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस पक्ष आघाडीच्या मदतीने सत्तेवर येण्याचे स्वप्न पाहत आहे. दोन्ही पक्ष आघाडी अंतर्गत सत्तेवर येण्याचा दावा करत आहेत. परंतु या दोन्ही पक्षांनी मागील निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेले आश्वासने पोकळ ठरल्याची टीका मायावतींनी केली आहे.
बसपसोबत अन्य कुठल्याही पक्षाला आघाडी करायची असल्यास त्याने रालोआ तसेच नव्याने निर्माण झालेल्या ‘इंडिया’शी कुठलाही संबंध ठेवू नये अशी आमची अट आहे. बसपला देखील सत्तेवर येण्याची संधी मिळू शकते. या सर्व गोष्टी विचारात घेत बसप मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा यासारख्या राज्यांमध्ये स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे मायावती यांनी म्हटले आहे.
भाजप 300 हून अधिक जागा जिंकणार असल्याचे दावा करत आहे. परंतु त्याच्या उक्ती अन् कृतीत फरक आहे. भाजपही काँग्रेससारखाच पक्ष ठरला आहे. सत्तेवर असताना या दोन्ही पक्षांचे दावे पोकळ सिद्ध होत राहिले आहेत. सत्तेवरून बाहेर पडल्यावरच काँग्रेसला दलित आणि मागास आठवू लागतात. काँग्रेस पक्ष सत्तेवर येण्यासाठी जातीयवादी पक्ष अन् भांडवलवादी शक्तींसोबत आघाडी करत आहे. सत्तेवर असताना भाजप तसेच काँग्रेसला कुणाचीच पर्वा नसते, केवळ बसपच दलित आणि मागासांसाठी काम करत आहे असे त्या म्हणाल्या.
युसीसीशी निगडित नियमांवर करावा विचार
मायावतींनी यापूर्वी समान नागरी संहितेवरून स्वत:ची भूमिका स्पष्ट केली होती. आमचा पक्ष समान नागरी संहितेच्या विरोधात नाही. परंतु राज्यघटना ही समान नागरी संहिता थोपण्याचे समर्थन करत नाही. भाजपने युसीसीशी निगडित सर्व पैलूंवर विचार करावा. आमचा पक्ष युसीसी लागू करण्याच्या विरोधात नाही, तर युसीसी लागू करण्याच्या भाजपच्या मॉडेलवर आमची असहमती असल्याचे त्यांनी म्हटले होते.
मजबूत होणार देश
प्रत्येक धर्माच्या अनुयायांकरता एक समान कायदा लागू झाल्यास देश कमजोर नव्हे तर मजबूत होणार आहे. तसेच लोकांमध्ये परस्पर सद्भाव निर्माण होईल. याचमुळे भारतीय घटनेच्या कलम 14 मध्ये युसीसी निर्मितीचा उल्लेख करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता.
उत्तरप्रदेशात बसपची हक्काची मतपेढी
उत्तरप्रदेशात बहुजन समाज पक्ष अलिकडच्या निवडणुकांमध्ये जागा जिंकण्याबाबत फारसा यशस्वी ठरलेला नाही. परंतु या पक्षाची मतपेढी कायम राहिली आहे. या पक्षाला दलितांची विशेषकरून जाटव समुदायाची एकगठ्ठा मते मिळत राहिली आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत बसप अन् समाजवादी पक्षादरम्यान आघाडी झाली होती. या आघाडीचा बसपला फटका बसल्याचे मानले गेले होते. याचमुळे बसपने यावेळी एकला चलो रे अशी भूमिका घेतली आहे.









