रायगड : प्रतिनिधी
महाड तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने तालुक्यातील सावित्री गांधारी आणि काळ या नद्यांना पूर आलेला आहे. यामुळे शहरातील काही भागात पुराचे पाणी शिरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाबळेश्वर, वरंध आणि किल्ले रायगड परिसरामध्ये पावसाचा जोर कायम असल्याने सावित्री नदीला पूर आलेला आहे.
महाड तालुक्यात पावसाने अक्षरशः थैमान घातले असल्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागात पुराचे पाणी शिरल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. जोरदार पर्जन्यवृष्टी आणि पुराचे पाणी यामुळे सखल भागात असलेल्या भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे गोठे गावामध्ये एक घर कोसळले असून तालुक्यात तीन घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे शहरातील 70 व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून तालुक्यामध्ये एकशे पंधरा कुटुंबातून चारशे चार व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे अशी माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी दिली.
नगरपालिकेने नागरिकांना सतर्क राहण्यासाठी भोंगा वाजवण्यास सुरुवात केली. गांधारी पुलाच्या परिसरात आणि सुकट गल्लीमध्ये दुपारच्या सुमारास पुराचे पाणी शिरले. यामुळे नागरिकांमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली. नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानातील साहित्य सुरक्षित स्थळी घालवण्यास सुरुवात केली तसेच मुंबई गोवा महामार्गावर नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित स्थळे पार्क केली. महाड शहरामध्ये दस्तुरी नाका, काकरतळे, कोटेश्वरी, भीम नगर, पंचशील नगर, तसेच शिवाजी चौक परिसरात पुराचे पाणी शिरले आहे.
दरम्यान महाड तालुक्यातील औद्योगिक परिसरात देखील रस्त्यावरील पाणी निचरा होत नसल्याने आणि नद्या नाले तुडुंब भरून वाहत असल्याने रस्त्यावर पाणी तुंबले. कारखान्यातील अनेक कामगारांनी आपली वाहने सुरक्षित स्थळी हलवली तर तालुक्यातील शाळांनी देखील सुट्टी जाहीर केली. किल्ले रायगड परिसरात तुफान पाऊस पडत असल्याने महाड रायगड रस्त्यावर देखील दरड कोसळली ही दरड प्रशासनाने तात्काळ बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. त्याचबरोबर निजामपुर कडे जाणारा रस्ता वाहून गेल्याने सुमारे सात ते आठ गावांचा संपर्क तुटला आहे. पानें पंधेरी कडे जाणाऱ्या रस्त्यावरील फुलावर काळ नदीचे पाणी आल्यामुळे हा रस्ता वाहतुकीला बंद करण्यात आला असून यामुळे सात ते आठ गावांचा संपर्क तुटला आहे त्याचप्रमाणे दासगाव मध्ये देखील सावित्री नदी आणि खाडीचे पाणी बंदरातील काही भागात शिरले असल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.