ऑनलाईन टीम / पुणे :
अजित पवार गटाने दोन वेळा शरद पवारांची भेट घेतली होती. शरद पवारांचे आशिर्वाद घेण्यासाठी तसेच पक्ष एकसंघ राहावा म्हणून विनंती करण्यासाठी ही भेट घेतल्याचे अजित पवार गटाकडून सांगण्यात आले होते. मात्र, या भेटीमागचं खरं कारण आता समोर आलं आहे.
विरोधकांची आघाडी मोडण्याचा भाजपचा विचार सुरु होता. विरोधी पक्षांची मोट बांधणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाच राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या दिल्लीतील बैठकीला बोलावण्याचे भाजपाचे प्रयत्न होते. शरद पवार यांना या बैठकीचं अनौपचारिक आमंत्रण होतं. त्यासाठी दोन दिवस अजित पवार गट शरद पवार यांची या बैठकीसाठी मनधरणी करत होता. मात्र, पवारांचा याला विरोध होता, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने एका संकेतस्थळाने प्रसिद्ध केली आहे.
अजित पवार समर्थक आमदारांसह युती सरकारमध्ये सामिल झाले आहेत. 2 जुलै रोजी अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर त्यांच्यासोबच्या 8 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती.








