सावंतवाडी : प्रतिनिधी
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी यु . लखमराजेंची निवड
सावंतवाडी संस्थांनाला फार मोठा शैक्षणिक वारसा लाभलेला आहे. पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांनी त्या काळामध्ये संस्थांनमध्ये एकूण उत्पन्नाच्या 12 टक्के उत्पन्न हे शिक्षणावर खर्च करण्याचे ठरवले त्यामुळेच त्यांना संस्थान परिसरामध्ये अनेक शाळा काढता आल्या. तेथे शिक्षकांची नेमणूक करून त्यांनी प्राथमिक शिक्षणाचा पाया संस्थांनमध्ये रचला. अनेक शाळांना स्वतः सातत्याने भेट देऊन तेथील शैक्षणिक व्यवस्था कशी चाललेली आहे हे ते नेहमी पाहत असत. त्या पुढील काळामध्ये राजेसाहेब श्रीमंत शिवरामराजे भोंसले यांनी 1961 मध्ये श्री पंचम खेमराज महाविद्यालयाची स्थापना करून आपल्या वडिलांनी जो शैक्षणिक पाया उभारलेला होता त्यांचे स्मरण म्हणून त्या काळामध्ये उच्च शिक्षणाची सोय सावंतवाडी मध्ये उपलब्ध करून दिली. कला , वाणिज्य, विज्ञान या विभागांमध्ये पदवी देणारे दक्षिण- रत्नागिरी जिल्ह्यामधील हे एकमेव कॉलेज होते. त्यांनी स्वतःची साडेसहा एकर जमीन व महाविद्यालयासाठी लागणारे डिपॉझिट भरून या महाविद्यालयाची स्थापना केली.
त्यासाठी त्यांना राजमाता श्रीमंत सत्वशीलादेवी भोंसले यांची समर्थ साथ लाभली. राजेसाहेब श्रीमंत शिवराम राजे भोंसले यांच्या पश्चात राजमाता श्रीमंत सत्वशीलादेवी भोंसले यांनी महाविद्यालयाची धुरा समर्थपणे चालवली. त्या काळात केजी ते पीजी शिक्षण देणारे एक अग्रगण्य महाविद्यालय म्हणून येथे नावारूपास आले. त्यानंतर राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले व राणीसाहेब श्रीमंत शुभदादेवी भोंसले यांनी महाविद्यालयाला एकाउच्च पातळीवर नेऊन ठेवले. यामध्ये अद्ययावत इमारती, उत्तम प्रयोगशाळा, आधुनिक सोयींनी युक्त संगणक कक्ष त्याचबरोबर नॅक नामांकनामध्ये महाविद्यालयाला अ श्रेणी प्राप्त झाली. व आता हे महाविद्यालय सिंधुदुर्गातील पहिले स्वायत्त महाविद्यालय म्हणून यूजीसी ने घोषित केलेले आहे.सावंतवाडी संस्थांनचे युवराज श्रीमंत लखमसावंत भोंसले सातत्याने महाविद्यालयाच्या विकासाकडे लक्ष ठेवून आहेत.अमेरिकेमध्ये जाऊन उच्च शिक्षण पूर्ण करून आल्यानंतर येथे शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी सातत्याने लक्ष पुरवलेले आहे. त्यांच्याकडे दूरदृष्टी आहे व भविष्यामध्ये अनेक योजना राबवण्याची इच्छा ते व्यक्त करतात.मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर त्यांची झालेली निवड ही श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या भविष्यातील योजनांची नांदीच ठरणारी आहे. युवराज लखम सावंत भोंसले यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील वाटचालीमध्ये युवराज्ञी सौ श्रद्धाराजे भोंसले यांची उत्कृष्ट साथ त्यांना लाभलेली आहे. सिनेटवर झालेल्या निवडीमुळे मुंबई विद्यापीठाच्या भविष्यातील अनेक शैक्षणिक योजनांसाठी युवराज लखमसावंत भोंसले यांचे मत हे महत्त्वाचे ठरणार आहे.याचा निश्चितच फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे उभरते नेतृत्व सिंधुदुर्गाला शैक्षणिक व औद्योगिक विकासाकडे घेऊन जाईल यात तीळमात्र शंका नाही.आपले आजोबा राजेसाहेब श्रीमंत शिवरामराजे भोंसले यांचा राजकीय व सामाजिक वारसा ते उत्कृष्टपणे चालवतील असा विश्वास वाटतो. त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.









