पणजी : पावसाळी अधिवेशनाला मंगळवारी 18 जुलैपासून सुरवात झाली असून, आजच्या पहिल्या दिवशी अर्थसंकल्पीय अधिवेशनातील अर्थसंकल्पाबाबत चर्चा करण्यात आली. 2022-2023 सालचा सरकारने सादर केलेला राज्याचा अर्थसंकल्प हा गोमंतकीय जनतेच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक केलेला आहे. या अर्थसंकल्पात सामान्य जनतेसाठी ठोस असा सरकारने कार्यक्रम व योजना निश्चित केल्या नसल्याचे विजय सरदेसाई यांनी सांगत सरकावर आरोप केले. सरदेसाई म्हणाले, राज्यात डबल इंजिन सरकार आहे, असे मुख्यमंत्री सांगत असले तरी आजही महागाई, बेरोजगारी, शहरांचे झालेले विद्रुपीकरण यामुळे जनता त्रासून गेलेली आहे. राज्यात दिवसेंदिवस महागाई व बेरोजगारी वाढत असताना सरकार यावर कोणतेच उपाय काढत नसून, विविध कार्यक्रमांसाठी कोट्यावधी ऊपयांची उधळपट्टी करीत असल्याचे त्यांनी सभापती तवडकर यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला.
स्वयंसहाय्य गटांनाही सरकारमुळे त्रास होत असल्याचे सांगत विजय सरदेसाई म्हणाले, ‘अक्षय पात्र’ ह्या बिगर गोमंतकीय गटाला आता सरकार नेमणार असल्याने यामुळे मूळ गोमंतकीय असलेल्या स्वयंसहाय्य गटांवर हा एकप्रकारे अन्यायच असल्याचे ते म्हणाले. राज्यातील शेतकऱ्यांसाठीही त्यांनी ठोस असे अर्थसंकल्पात नियोजन केले नसल्याचे दिसते. 2021-2022 मध्ये शेतकऱ्यांना इन्कम दुप्पट होईल, हे सरकारने दिलेले आश्वासन कुठे गेले? याचे सरकारने उत्तर द्यायला हवे, असे विजय सरदेसाई यांनी सांगत सादर केलेल्या अर्थसंकल्पावर बोट ठेवले. भूमीगत वाहिन्यांसाठी खोदकाम केल्यामुळे शहरांची बकाल अवस्था झालेली आहे. राजधानी पणजी शहरही यातून सुटू शकले नसल्याचे ते म्हणाले. पहिल्याच पावसात पणजी कशी तुंबली हे साऱ्या जनतेने अनुभवल्याचे सांगून सरकारचे हे शहरांबाबत योग्य कृती आराखडा नसल्याचेच फलद्रुप असल्याचे सरदेसाई म्हणाले. राज्यातील बहुतांश शहरांची वाताहत झाल्याचे ते म्हणाले.
आमदार डॉ. शेट्योंकडून कौतुक
2022-2023 या सालचा सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्प हा बहुआयामी तसेच पुढील 25 वर्षांचा विचार करून बनविला असल्याचे सांगत डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. मुख्यमंत्री सावंत यांनी अनेक योजना व प्रकल्प तडीस नेले आहेत. युवकांसाठी नोकऱ्या मिळाव्यात यासाठी प्रशिक्षण व कौशल्यात्मक कार्यक्रम हाती घेतले आहेत, जे बेरोजगारी कमी करण्यास मदत करणार असल्याचे ते म्हणाले. विरोधकांनी सरकारच्या कामाचे कौतुक करण्याऐवजी नेहमीच जनतेत संभ्रम निर्माण केला असल्याचेही ते म्हणाले.
दोन किलो टोमॅटो मोफत द्या : सरदेसाई
टोमॅटोचे भाव भलतेच भडकले असून गोव्यातील प्रत्येकाला सरकारने दोन किलो टोमॅटो मोफत देण्याची मागणी आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत शून्य तासाला केली. टोमॅटोचे दर आता प्रतिकिलो रु. 300 होण्याची भीती असून गोव्यात ते रु. 140 प्रतिकिलोने मिळतात, असेही त्यांनी निदर्शनास आणले. त्यावर उत्तर देताना कृषीमंत्री रवी नाईक यांनी गोव्यातील जनतेला फलोत्पादन महामंडळाच्या विक्री केंद्रावर रु. 103 प्रतिकिलो या दराने टोमॅटो देण्यात येतात, असे सांगितले. इतर राज्यांतील बाजारभावाच्या तुलनेत हा दर कमी असून कोणाची तक्रार नाही. लोकांनाही अडचण नाही, असे नाईक म्हणाले.









