दमदार पावसामुळे सारेच समाधानी : पिकांना पोषक वातावरण
बेळगाव ; पावसाने दडी मारल्यामुळे साऱ्यांच्याच तोंडचे पाणी पळाले होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे साऱ्यांना दिलासा मिळाला. मंगळवारी तर दिवसभर दमदार सरी कोसळल्या. पावसामुळे शहरातील काही सखल भागांमध्ये काहीवेळ पाणी साचून होते. या पावसामुळे साऱ्यांचीच तारांबळ उडाली. मान्सूनमधील पहिल्याच दमदार पावसामुळे स्मार्ट सिटीच्या कामांचा दर्जा उघडा पडला आहे. पावसामुळे बाजारपेठेतील फेरीवाले व बैठ्या व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. मृग आणि आर्द्राने पाठ फिरविली. मात्र शेवटच्या टप्प्यात पुनर्वसुने साथ दिली आहे. त्यामुळे साऱ्यांच्याच आशा पल्लवीत झाल्या आहेत. जुलै महिना अर्ध्यावर आला तरी पावसाचा पत्ता नव्हता. काही प्रमाणात पाऊस झाला तरी तो पाऊस पाणीटंचाई दूर करणारा नव्हता. त्याचबरोबर पिकांना तारणाराही नव्हता. मात्र सोमवार आणि मंगळवारी झालेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. सोमवारी तालुक्यामध्ये 16 मि.मी. तर मंगळवारी 28 मि. मी. पावसाची नोंद झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
सोमवारी दिवसभर अधूनमधून सरी कोसळल्या. त्यानंतर सोमवारी रात्री आणि मंगळवारीही दिवसभर पावसाच्या रिपरिपसह अधूनमधून दमदार सरी कोसळल्या. या पावसामुळे शहरातील गटारी तुडुंब भरून वाहत होत्या. काही ठिकाणी गटारीत कचरा अडकून रस्त्यावरून पाणी वाहत होते. त्यामधून वाट काढताना साऱ्यांचीच कसरत होत होती. या पावसामुळे रस्त्यावरील ख•dयांमध्ये पाणी साचून होते. तर स्मार्ट सिटीमध्ये योग्यप्रकारे कामे केली गेली नाहीत. त्याठिकाणी तासन्तास पाणी तुंबून होते. गांधीनगरमधील राष्ट्रीय महामार्गाच्या ओव्हरब्रिजखाली असलेल्या भुयारी मार्गामध्ये यावर्षी पहिल्यांदाच काही प्रमाणात पाणी साचले होते. त्यामधून वाहने चालविणे कसरतीचे ठरत होते. काही उपनगरांमध्ये रस्ते कच्चे असल्यामुळे दुचाकीस्वारांना व पादचाऱ्यांना त्या रस्त्यावरून चालणेदेखील अवघड झाले होते. स्मार्ट सिटीमधील काही कामे अर्धवट आहेत. त्याठिकाणी चिखल झाला होता. पहिल्याच दमदार पावसामुळे स्मार्ट सिटी शहराची अवस्था उघड्यावर पडली आहे. यावरून विकास झाला की नाही? हे आता पहावे लागणार आहे.
रुक्मिणीनगर परिसर चिखलमय
महांतेशनगरला लागून असलेल्या रुक्मिणीनगर परिसरामध्ये चिखलाचे साम्राज्य पसरले होते. त्यामधून वाट काढणे साऱ्यांनाच कसरतीचे ठरत होते. सर्वत्र चिखल झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आम्ही जगायचे कसे? असा प्रश्न ते करत होते. एकूणच परिस्थिती गंभीर होती. नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या.
शहापूर, नाथ पै सर्कल येथे घर कोसळले
शहापूर, भारतनगर पहिला क्रॉस येथे असलेले जुने घर कोसळले. आठ दिवसांपूर्वीच या घरातील सर्व जण दुसऱ्या घरामध्ये स्थलांतरीत झाले होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. विजय मनोहर चव्हाण यांचे घर कोसळले असून त्यामध्ये पाच लाखांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.
कणबर्गी परिसरात ख•sच ख•s
कणबर्गी येथील रस्ते अर्धवट असल्यामुळे या परिसरातील नागरिकांना समस्येला तोंड द्यावे लागले आहे. गोकाक मुख्य रस्त्यावरच मोठमोठे ख•s पडल्यामुळे वाहन चालकांना वाहने चालविणे कसरतीचे ठरत होते. त्यामुळे महापालिका आणि स्मार्टसिटीच्या कामाबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. पावसामुळे ख•dयांमध्ये पाणी साचून राहत होते. त्यामुळे वाहन चालविणे अवघड जात होते. स्मार्टसिटीमधील सर्वच कामे अर्धवट झाल्यामुळे ही अवस्था गंभीर बनली आहे.
मंडोळी रोड-भवानीनगर परिसरात पाणी
मंडोळी रोडवरील भवानीनगर परिसरात पावसाबरोबरच ड्रेनेजचे पाणीही रस्त्यावरुन वाहत होते. त्यामुळे सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. या पाण्यामधून ये-जा करणे साऱ्यांनाच अवघड झाले होते. ड्रेनेजचे पाणी आणि पावसाचे पाणी रस्त्यावरुन वाहत असल्यामुळे सर्वत्र दुर्गंधीही पसरली होती. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. एकूणच पहिल्याच दमदार पावसामुळे शहरातील अनेक नगरांमध्ये मोठी समस्या निर्माण झाल्याचे दिसून आले.
राकसकोप परिसरात दमदार पाऊस
बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी पहाटेपासूनच दमदार पाऊस झाला. मार्कंडेय नदी, जांभूळ ओहळ व जलाशयाला मिळणाऱ्या नाल्यातून पाण्याचा प्रवाह वाढल्याने राकसकोपच्या पाणीपातळीत वाढ झाली. 1.15 फूट पाणीसाठ्यात वाढ झाल्याने मंगळवारी सकाळी पाणीपातळीत 2453.25 फूट नेंद झाली आहे. डेडस्टॉकमधील 2447 फूट पाणीपातळीत सव्वासहा फुटाने वाढ झाल्याने शहर व उपनगरवासीयांना दिलासा मिळाला आहे. या परिसरात मंगळवारी सकाळी 35.6 मि.मी. तर यावर्षी एकूण 569.9 मि.मी. पाऊस झाला आहे. मागीलवर्षी याच दिवशी एकूण 1136.7 मि.मी. पाऊस झाला होता तर पाणीपातळी 2473.10 फूट इतकी होती. जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी लागणाऱ्या 2475 फूट पाणीपातळीसाठी 21.75 फूट पाण्याची आवश्यकता आहे. मंगळवारी दिवसभर या परिसरात दमदार पाऊस झाल्याने सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत पाणीपातळीत एक फुटाने वाढ झाली आहे. सायंकाळी पाणीपातळी 2454.25 फूट इतकी झाली आहे. मागीलवर्षी 17 जुलै रोजी पाणीपातळी 2473.55 झाल्यानंतर जलाशयाच्या वेस्टवेअरच्या सहा दरवाजांपैकी दोन दरवाजे फुटाने उघडत पाणीपातळी कमी केली होती.









