जिल्हाधिकाऱ्यांसोबत सल्लागार समितीची चर्चा
बेळगाव : बेळगाव विमानतळाचा विस्तार व आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारकडून 230 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. विमानतळाचा विस्तार केल्यास एक आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारू शकते. यासाठी 56 एकर जागेची गरज असून यासंदर्भात विमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची भेट घेतली. मंगळवारी सकाळी विमानतळावर सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी विमानतळाच्या विस्तारीकरणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विमान प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्या पद्धतीने टर्मिनल बिल्डिंगचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात येवून डॉ. नितेश पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, खासदार मंगला अंगडी, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य भारत देशपांडे, संजना भंडारी, गुरुदेव पाटील, प्रियांका आजरेकर, अनुप काटे, विमानतळ संचालक एस. त्यागराजन आदी उपस्थित होते.









