इच्छुकांचे लक्ष तारखेकडे : राजकीय हालचालींनाही वेग
बेळगाव : जिल्ह्यातील ग्रा. पं. च्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदांसाठीची निवडणूक लवकरच घेण्यात येणार आहे. यासाठी निवडणूक विभागाकडून तयारी करण्यात आली आहे. याची जबाबदारी संबंधित तालुक्यांच्या तहसीलदारांवर सोपविण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक घेतली जाणार आहे. निवडणुकीच्या तारखेकडे ग्रा. पं. सदस्यांचे लक्ष लागून राहिले असून, राजकीय हालचालींनाही वेग आला आहे. जिल्ह्यातील ग्राम पंचायतींवर अध्यक्ष-उपाध्यक्ष म्हणून निवड झालेल्या सदस्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपला आहे. या पार्श्वभूमीवर पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणूक घेतली जाणार आहे. यासाठी निवडणूक विभागाकडून आवश्यक तयारी करण्यात आली आहे. संबंधित ग्रा. पं. च्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठीचे आरक्षण यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. 30 महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेल्या ग्रा. पं. च्या सदर पदांसाठीची निवड 25 जुलैपासून घेतली जाणार असल्याचे निवडणूक विभागाच्या सूत्रांकडून सांगितले जात आहे. सदर निवडणूक संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली घेतली जाणार आहे. यासाठी तहसीलदारांकडूनच निवडणूक अधिकारी म्हणून नोडल अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक नोडल अधिकाऱ्याला चार ते पाच ग्रा. पं. ची जबाबदारी सेपविण्यात आली आहे. नोडल अधिकाऱ्यांच्या सोयीनुसार 30 महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेल्या ग्रा. पं. अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवड केली जाणार आहे. इच्छूक असणाऱ्या ग्रा. पं. सदस्यांचे निवडणूक तारखेकडे लक्ष लागून राहिले आहे.
पोटनिवडणुकीनंतर अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड प्रक्रियेला चालना मिळणार
जिल्ह्यामध्ये अनेक ग्रा. पं. मध्ये वेगवेगळ्या कारणांनी ग्रा. पं. सदस्यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. त्या जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. पोटनिवडणुकांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुका झाल्यानंतरच अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड प्रक्रियेला चालना मिळणार आहे.
ग्रा. पं. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील 56 ग्राम पंचायतींच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदांसाठी लवकरच निवडणूक घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर 12 नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक नोडल अधिकाऱ्यांकडे चार ते पाच ग्रा. पं. ची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 30 महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेल्या ग्राम पंचायतींच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदांची निवड करण्यात येणार आहे.
ग्राम पंचायतींनुसार नेमणूक केलेले नोडल अधिकारी
- ग्रामीण शिक्षण अधिकारी-एस. पी. दासपण्णावर-आरळीकट्टी, बागेवाडी, अंकलगी, बडस के. एच, मुत्नाळ.
- साहाय्यक अभियंते कर्नाटक नगर पाणीपुरवठा विभाग-अशोक शिरुर- येळ्ळूर, धामणे एस., सुळगा (ये), बिजगर्णी, बेळवट्टी.
- साहाय्यक कार्यकारी अभियंते लघु पाणीपुरवठा विभाग-एस. आर. मळगली- उचगाव, सुळगा (उ.), तुरमुरी, कुद्रेमनी, आंबेवाडी.
- साहाय्यक अभियंते बी. एस. शंभोलिंगप्पा-कडोली, काकती, होनगा, कंग्राळी (केएच), धरणट्टी.
- पशुसंगोपन खात्याचे साहाय्यक निर्देशक आनंद पाटील-मारिहाळ, बाळेकुंद्री (केएच), सुळेभावी, बाळेकुंद्री (बीके).
- तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी-राजेश धनवाडकर-हिंडलगा, बेकिनकेरे, बेनकनहळ्ळी, बेळगुंदी.
- साहाय्यक अभियंते एस. बी. कोळी-नवीन वंटमुरी, हंदिगनूर, केदनूर, बंबरगा, अगसगे.
- शहरशिक्षणाधिकारी एल. एस. हिरेमठ- मुतगा, सांबरा, निलजी, मोदगा.
- कार्यकारी अभियंते बांधकाम खाते-सुभाष व्ही. नाईक-किणये, कंग्राळी बीके., मंडोळी, संतिबस्तवाड.
- साहाय्यक कृषी अधिकारी, पटगुंदी -मुचंडी, अष्टे, हुदली, तुमरगुद्दी, कलखांब.
- साहाय्यक अभियंते हेस्कॉम, ग्रामीण-वैशाली तुडवेकर-बस्तवाड, हलगा, तारीहाळ, मास्तमर्डी, के. के. कोप.
- वरिष्ठ साहाय्यक बागायत अधिकारी-प्रवीण महेंद्रकर-भेंडीगेरी, देसूर, नंदिहळ्ळी, वाघवडे (मार्कंडेयनगर), कुकडोळी.









