प्रमोद मुतालिक यांची पत्रकार परिषदेत माहिती
बेळगाव : समान नागरी कायदा अस्तित्वात यावा, यासाठी श्रीराम सेनेकडून 5 लाख सह्यांची मोहीम आखण्यात आली आहे. कर्नाटकातून पाच लाख लोकांच्या सह्यांचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले जाणार आहे. हा कायदा कोणत्याही धर्माच्या विरोधात नसून देशात समानता आणण्यासाठी असल्याचे श्रीराम सेनेचे राष्ट्रीय प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. कर्नाटक सरकारच्या धर्मादाय खात्याने मंदिरांमधील मोबाईल बंदीचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. चिकोडी येथे जैन मुनींची झालेली हत्या हा एक क्रूरपणाचा प्रकार आहे. साधूंची केलेली हत्या राज्यासाठी अशोभनीय आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे दुर्लक्ष न करता याची चौकशी निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली करावी. याचबरोबर दोन्ही आरोपींचे वकीलपत्र कोणीही घेऊ नये, यासाठी चिकोडी व बेळगाव बार असोसिएशनला निवेदन दिले जाणार आहे. गोव्यामध्ये पोर्तुगीज असताना समान नागरी कायदा अस्तित्वात होता. 1961 मध्ये गोवा स्वतंत्र झाला. परंतु गोव्यातील समान नागरी कायदा आहे तसाच ठेवण्यात आला. गोव्यात कोठेही कोणत्याही समाजावर आजवर अन्याय झालेला नाही. त्यामुळे देशातही समान नागरी कायदा लागू करणे गरजेचे आहे. एका खासगी वृत्तवाहिनींने केलेल्या सर्व्हेमध्ये 67 टक्के मुस्लीम महिलांनी या कायद्याला पाठिंबा दिल्याचे मुतालिक यांनी सांगितले. यावेळी माजी खास. अॅड. ए. के. कोटारशेट्टी, श्रीराम सेनेचे जिल्हाप्रमुख रवी कोकितकर यासह इतर उपस्थित होते.









