बालकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय : पाण्याचा प्रश्न मार्गी
बेळगाव : अंगणवाडी केंद्रांना जलमिशन योजनेंतर्गत शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. बालकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. शहर आणि ग्रामीण भागातील काही अंगणवाड्यांमध्ये पाण्याची सोय नसल्याने मिळेल ते पाणी पिण्याची वेळ चिमुकल्यांवर आली आहे. त्यामुळे पाण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या जलमिशनमधून पाणीपुरवठा केला जाणार आहे. जिल्ह्यात 5,300 हून अधिक अंगणवाडी केंद्रे आहेत. मात्र, बहुतांश केंद्रांमध्ये पिण्याच्या पाण्याविना गैरसोय निर्माण होऊ लागली आहे. शुद्ध पाणी उपलब्ध नसल्याने बालकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. याचा खात्याने गांभीर्याने विचार करून शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. गावोगावी पाण्यासाठी जलमिशन योजना राबविली जात आहे. याअंतर्गत घरोघरी नळाची जोडणी केली जात आहे. अंगणवाडी केंद्रांमध्येही या योजनेंतर्गत स्वतंत्र नळाची जोडणी केली जाणार आहे. त्यामुळे अंगणवाड्यांतील शुद्ध पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. पाण्याबरोबर काही अंगणवाड्यांमध्ये स्वच्छतागृहांची कमतरता आहे. अशा अंगणवाड्यांचा सर्व्हे करून त्या ठिकाणी स्वच्छतागृहांची निर्मिती केली जाणार आहे. पावसाला सुरुवात झाल्याने काही अंगणवाड्यांना दूषित पाण्याचा पुरवठा होऊ लागला आहे. त्यामुळे बालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. शुद्ध पाणी उपलब्ध नसल्याने ही परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. मात्र, आता जलमिशन योजनेंतर्गत नळ जोडणी करून प्रत्येक अंगणवाडी केंद्राला पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे.
कामाला लवकरच सुरुवात
महिला व बालकल्याण खात्यामार्फत अंगणवाड्यांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जलमिशन योजनेंतर्गत सर्व अंगणवाड्यांना पाणी दिले जाणार आहे. याबाबत अद्याप आदेश आलेला नाही. मात्र, लवकरच कामाला सुरुवात होईल.
-नागराज आर. (सहसंचालक, महिला व बालकल्याण खाते)









