व्यापारी आता युपीआयसह पेमेंट करु शकणार : दोन्ही देशांच्या अर्थमंत्र्यांमध्ये चर्चा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
स्थानिक चलनाला चालना देण्यासाठी फ्रान्स आणि युएइसोबत रिअल-टाइम पेमेंट यंत्रणा आणि स्थानिक चलन व्यापार करारावर स्वाक्षरी केल्यानंतर, भारत आता इंडोनेशियाशी असा करार करण्याची तयारी करत आहे. दोन्ही देशांच्या अर्थमंत्र्यांमध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर ही माहिती मिळाली आहे.
अहवालानुसार, सरकार दोन्ही देशांमधील डिजिटल पेमेंटची मर्यादा वाढविण्याचा विचार करत आहे, ज्यामुळे युपीआय आणि इतर तत्सम पेमेंट यंत्रणा वापरण्यास प्रोत्साहन मिळेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत झालेल्या बैठकीदरम्यान इंडोनेशियाच्या अर्थमंत्री मुलानी इंद्रावती म्हणाल्या, ‘दोन्ही देश डिजिटल तंत्रज्ञान, मध्यवर्ती बँकांच्या अंतर्गत पेमेंट यंत्रणा आणि स्थानिक चलनाच्या वापराबाबत सहकार्याच्या शक्यतेवर चर्चा करणार आहेत.
एकमेकांच्या चलनात व्यवहार होईल
अधिकाऱ्यांच्या मते, चलन प्रणाली संयुक्त अरब अमिराती सारखीच राहणार आहे. म्हणजे भारतीय निर्यातदार त्यांचा व्यापार इंडोनेशियन रुपयात (रुपिया) करू शकतात, तर इतर पक्ष (इंडोनेशियन व्यापारी) त्यांचे पाम तेल आणि इतर व्यवहार भारतीय रुपयात करू शकतात.
सहावा मोठा भागीदार
भारताचा सहावा सर्वात मोठा व्यापारी भागीदार इंडोनेशिया आहे. इंडोनेशिया भारताच्या नियमित व्यापार भागीदारांपैकी एक आहे, दोन्ही देशांमधील व्यापार गेल्या वर्षी सुमारे 3.20 लाख कोटी रुपयांचा होता. 2022 मध्ये इंडोनेशिया हा भारताचा सहावा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता. या काळात, पाम तेल आणि पेट्रोलियमच्या मोठ्या शिपमेंटमुळे, इंडोनेशियाने भारतीय व्यापारातून 1.55 लाख कोटी रुपयांचा व्यापार अधिशेषही मिळवला आहे.
इंडोनेशिया हा आसियान प्रदेशातील उपखंडाचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आणि आशियातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. अहवालात असे म्हटले आहे की इंडोनेशियासह इतर अनेक देशांना भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये रस असल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली आहे.