वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय इलेक्ट्रिक दुचाकी निर्माती करणारी कंपनी ओकिनावा ऑटोटेक यांनी ओखी-90 ची अद्ययावत आवृत्ती सादर केली आहे. ओखी-90 चे 2023 मॉडेल हे अनेक प्रकारच्या हायटेक वैशिष्ट्यासह अपग्रेड करण्यात आले असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. यावेळी ई-स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 160 किलोमीटर धावू शकणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
2023 ओकिनावा ओखी-90 ई-स्कूटरची किंमत 1.86 लाख (एक्स-शोरूम) आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये स्कूटरची डिलिव्हरी सुरू होणार असल्याची माहिती आहे. कंपनीने गेल्यावर्षी देशात पहिल्यांदा ओखी-90 ला लाँच केले होते.
कंपनीचे म्हणणे आहे की त्यांनी आतापर्यंत 10,000 पेक्षा जास्त इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री केली आहे. सदरची स्कूटर ही लाल, निळा, राखाडी आणि पांढऱ्या रंगाच्या चार पर्यायांमध्ये सादर केली आहे. बॅटरी आणि पॉवर ई-स्कूटर आता नवीन लिथियम-आयन बॅटरी पॅकसह सुसज्ज आहे.
सदरच्या गाडीचा टॉप स्पीड 80 ते 90 कि. मी. प्रतितास इतका राहणार आहे. या गाडीत इलेक्ट्रॉनिक असिस्टेट ब्रेकिंग सिस्टिमची सोय असणार आहे. डिजिटल स्पीडोमीटर, अँटीथेप्ट अलार्म, जीपीएस नेव्हीगेशन आणि ब्लुटुथ कनेक्टिव्हीटी या सुविधाही गाडीत उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ओकिनावाच्या अॅपद्वारे वाहनधारकाला स्मार्टफोनशी संपर्क साधता येणार आहे.









