तळेरे :प्रतिनिधी
तळेरे येथे संवाद परिवाराच्या वतीने आणि ज्येष्ठ रंगकर्मी वामन पंडित यांच्या ‘निलामय’ या संस्थेमार्फत व त्यांच्या संकल्पनेतून प्रसिध्द कथाकार “जी.ए.कुलकर्णी यांच्या शताब्दी संस्मरण” कार्यक्रमांतर्गत अभिवाचन जागर करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.यावेळी तीन कथा वाचकांनी वेगवेगळ्या तीन कथांचे अभिवाचन केले.सदरचा कार्यक्रम वामनराव महाडिक विद्यालयाच्या डॉ.एम्.डी.देसाई सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर वामन पंडित, डॉ.मिलिंद कुलकर्णी, कथा अभिवाचक सौ.सीमा मराठे, सौ.वर्षा वैद्य, डॉ. गुरुराज कुलकर्णी, सचिन पावसकर, प्रवीण पोकळे, चंद्रकांत तळेकर, दादा महाडिक आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी वामन पंडित यांनी या कार्यक्रमामागची संकल्पना सविस्तरपणे स्पष्ट करतांना सांगितले की,स्वातंत्र्योत्तर काळातील नामवंत कथा,कादंबरीकार म्हणून जी.ए.कुलकर्णी यांचा साहित्यिक क्षेत्रात मोठा प्रभाव होता.त्यांच्या लेखनशैलीने स्वत:च असं वेगळ वैशिष्ट्य सिद्ध केले आहे.जी.ए.कुलकर्णी यांच्या अनेक शैलीदार कथा कादंबऱ्यांमधून त्यांचे विविध पैलू अनुभवायला मिळतात असे पंडित यांनी याप्रसंगी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी वेंगुर्ले येथील किरात साप्ताहिकाच्या संपादिका सौ.सीमा मराठे यांनी जी. ए. कुलकर्णी यांच्या ‘हिरवे रावे’ या कथा संग्रहातील “माणसाचे काय,माकडाचे काय” ही सुरस कथा सादर केली.या कथेतील सुभ्राव राव ही व्यक्तीरेखा म्हणजे वयोवृध्द असलेले गणित विषयाचे सेवानिवृत्त शिक्षक आजारी आणि एकाकी बाहेरच्या जगाशी संपत चाललेला संवाद यामुळे आलेली उदासीनता,मुले दूर गेल्यामुळे होणारी चिडचिड,एकाकीपणाची भावना आणि व्यतीत झालेले जीवन,असह्य वेदना याचे भावविश्व सौ.सीमा मराठे यांनी अतिशय उत्तम प्रकारे सादर केले.
त्यानंतर कुडाळ येथील लेखीका,कवयित्री,अभिनेत्री सौ.वर्षा वैद्य यांनी “पिंगळावेळ” या कथासंग्रहातील ‘लक्ष्मी’ ही कथा वाचन केली.ही कथा गरीबीने ग्रासलेल्या एका अबला ब्राह्मण स्त्रीची आहे.नवरा आणि सावत्र मुलगा यांच्या जाचक त्रासाला कंटाळून आणि सततच्या संघर्षमय जीवनात दारिद्र्याशी कशाप्रकारे झुंज देत लक्ष्मी दु:ख सहन करत असते तसेच गावकुसाबाहेर निर्मनुष्य व दुर्लक्षित असणाऱ्या कपिलेश्वर मंदिराचा आश्रय घेऊन तिथेच ती आपला अखेरचा श्वास घेते याचे यथार्थ चित्र रसिकांसमोर उभे केले ते उत्तम अभिनय कौशल्य आणि तितकीच सुंदर शब्दफेक करीत आपल्या ओघवत्या शैलीत वर्षा वैद्य यांनी सुंदर कथा सादर केली.
त्यानंतर डॉ.गुरुराज कुलकर्णी यांनी “काजळमाया” कथा संग्रहातील ‘पुनरपी’ ही कथा सादर केली.माणसाच्या जीवनातील जन्म आणि मृत्यू यातील सुंदर अंतर दाखविणारी कथा.दादा आणि माई हे वृध्द दांपत्य आणि लाडली नावाचे मांजर यांच्या भोवती फिरणारे हे कथानक आहे.दादांच्या मृत्यू नंतर लाडली नावाची मांजर चार पिल्लांना जन्म देते.त्या पिल्लांना सुरक्षित ठेवण्यासाठी जागा शोधत असते.समोर निर्जीव होऊन पडलेला दादांचा देह आणि त्याचवेळी घरात जागा करु पाहणारी लाडलीची नवजात पिल्ले.एक जागा खाली झाली की देव दुसरी जागा भरून काढत असतो.तसाच काहीसा प्रसंग मानला पहावयास मिळतो. हेच जन्म आणि मृत्यू यातील अंतर डॉ.कुलकर्णी या कथेचं उत्तम सादरीकरण करतांना केले.
#latest news in marathi online#मराठी बातम्या#marathi news paper today#online marathi news#tarun bharat newspaper today









