आजपासून सुरू होणार अधिवेशन
पणजी : राजधानी पणजी शहरातील बहुचर्चित कला अकादमीचा भाग कोसळल्याचे पडसाद आज मंगळवार 18 जुलैपासून सुरू होणाऱ्या विधानसभा पावसाळी अधिवेशनात उमटणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्या राजीनाम्याची मागणी अधिवेशनात होण्याची शक्यता आहे. परिणामी अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस कला अकादमीच्या विषयावरून गाजणार असल्याची लक्षणे दिसत आहेत. याआधी झालेल्या विधानसभा अधिवेशनात कला अकादमीच्या विषयावरून अनेकदा गदारोळ झालेला आहे. तेथील बांधकामात, नूतनीकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी चौकशी समिती नेमली होती. त्या समितीचे पुढे काय झाले, याचा कोणालाच पत्ता नाही. कारण समितीची बैठक, चौकशी असे काहीच झालेले नाही. विरोधकांच्या तोंडाला तेवढ्यापुरती पाने पुसण्याचे काम करण्यात आले. अकादमीच्या बांधकामावरून सरकारवर, मंत्री गावडे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. परंतु शेवटी त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. आता कला अकादमी इमारतीचा काही भाग कोसळल्यामुळे पुन्हा तोच विषय ऐरणीवर आला असून विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले आहे. त्याचा पुरेपूर लाभ उठवून ते सरकारला, तसेच मंत्री गावडे यांना विधानसभेत कोंडीत पकडणार आहेत. या प्रकरणी अधिवेशनाचे कामकाज रोखून धरण्याची रणनीती विरोधकांनी आखल्याचे सांगण्यात आले.









