विजय सरदेसाई सरकारला घेरण्याच्या तयारीत, विधानसभेत 324 प्रश्न सादर
पणजी : गेल्या अनेक वर्षांच्या काळानंतर सरकारने 18 दिवसीय पावसाळी अधिवेशन नियोजित केले आहे. याबद्दल सरकारचे आभार मानतो. परंतु या अधिवेशनात विरोधी आमदारांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी सरकारने सामोरे जाण्याची गरज आहे. कारण जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी विधानसभेत मी वारंवार जनताभिमुख प्रश्न उपस्थित केले. परंतु या प्रश्नांना सरकारने बगल दिल्याचाच अधिक अनुभव आला आहे. यंदाच्या पावसाळी अधिवेशनात सरकारने जनतेच्या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विजय सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत केली. मंगळवारी 18 जुलैपासून होणाऱ्या पावसाळी अधिवेशनासाठी गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांनी वेगळी रणनिती आखली असून, त्यासंबंधी त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती देत यंदाच्या अधिवेशनासाठी आपण 324 प्रश्न उपस्थित करणार असल्याचे सांगितले.
ते म्हणाले, मुख्यमंत्री सावंत सरकार हे घोटाळे करण्यात दंग आहे. ते जनताभिमुख एकही कार्यक्रम हाती घेत नसून, केवळ आर्थिक लाभाचे कार्यक्रम राबविण्यात दंग आहे. हे कार्यक्रम इनडोअर स्टेडियम किंवा हॉटेलांचे सभागृह यांची निवड करतात. त्यामुळे हे सरकार म्हणजे जनतेच्या प्रश्नासंबंधी गाभीर्याने घेत नसल्याचे सिद्ध होते. विधानसभेत जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडून सरकारकडून उत्तरे मिळविण्याबरोबरच ती समस्या सुटण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न राहील, असेही ते म्हणाले. राज्यात विजेचा प्रश्न व वाढते दर यामुळे जनता त्रस्त आहे. गॅस सिलिंडरचे वाढलेले भरमसाठ दर यामुळे सामान्य जनतेचे मोडणारे कंबरडे, शिक्षितांना नोकऱ्यांपासून वंचित रहावे लागत आहे. शेतकऱ्यांनाही अनेक दिव्य पार पाडून शेती करावी लागत आहे. तरीही या राज्यातील भाजप सरकारकडे कोणताही ठोस कार्यक्रम हाती नसल्याचा आरोप विजय सरदेसाई यांनी केला.
या मुद्यांवरून सरकारला घेरणार सरदेसाई
विजय सरदेसाई म्हणाले, सरकारला अधिवेशन काळात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नातील बहुतांश प्रश्न हे महागाई, वाढती बेरोजगारी, वाढलेले विजेचे भरमसाट दर, धोक्यात असलेले म्हादई नदीचे अस्तित्व, वाढते गुन्हेगारीचे प्रमाण, दक्षिण व उत्तर गोवा इस्पितळांची झालेलीय दयनीय स्थिती, माध्यान्ह आहाराबाबत दिलेले कंत्राट, शेतकऱ्यांचे प्रश्न, संजीवन साखर कारखान्यातील कामगारांवर होणारा अन्याय आदीं जनताभिमुख प्रश्नांचा समावेश असल्याचे ते म्हणाले.









