सावगाव रोडवरील दुर्दैवी घटना
बेळगाव : अशास्त्राrय पद्धतीने घातलेल्या गतिरोधकावरून पडून गंभीर जखमी झालेल्या एका अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा सोमवारी खासगी इस्पितळात मृत्यू झाला. सावगाव रोडवरील अंगडी कॉलेजजवळ ही घटना घडली आहे. ऋषिकेश सत्यप्रमोद कुलकर्णी (वय 27) रा. बुधवार पेठ, टिळकवाडी असे त्या दुर्दैवी विद्यार्थ्याचे नाव आहे. बुधवार दि. 12 जुलै रोजी दुचाकीवरून कॉलेजला जाताना अशास्त्राrय पद्धतीने घालण्यात आलेल्या गतिरोधकावरून पडून हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला होता. ऋषिकेशला खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. उपचारांचा उपयोग न होता सोमवारी त्याचा मृत्यू झाला आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. ऋषिकेश हा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता. विद्यार्थ्याच्या अपघाती मृत्युमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, तीन बहिणी असा परिवार आहे.









