प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच काढला पतीचा काटा : मुडलगी तालुक्यातील वडेरहट्टीतील घटनेने खळबळ
बेळगाव : सोमवती अमावास्येच्या पार्श्वभूमीवर पत्नीसमवेत देवदर्शनासाठी गेलेल्या एका तरुणाचा मंदिराजवळ भीषण खून करण्यात आला आहे. मुडलगी तालुक्यातील वडेरहट्टी येथे ही घटना घडली आहे. खून झालेल्या तरुणाच्या पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले असून पत्नीसह दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या खुनांच्या मालिकेमुळे पोलीस अधिकारी हैराण झाले आहेत. शंकर सिद्धप्पा जगमुत्ती (वय 28) रा. वडेरहट्टी असे खून झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव असून केवळ चार महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शंकर आपल्या पत्नीसह वडेरहट्टी येथील बनसिद्धेश्वराच्या दर्शनाला गेला होता. त्यावेळी ही घटना घडली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
श्रीधर अर्जुन तळवार (वय 21) रा. भैरनट्टी व खून झालेल्या शंकरची पत्नी सिद्धव्वा ऊर्फ प्रियांका शंकर जगमुत्ती (वय 21) या दोघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रियांकाच्या डोळ्यादेखत तिच्या प्रियकराने शंकरचा कोयत्याने वार करून खून केला आहे. सुरुवातीला या घटनेशी आपला कसलाच संबंध नाही, या थाटात प्रियांका वावरत होती. उपलब्ध माहितीनुसार 16 मार्च 2023 रोजी प्रियांका व शंकर यांचे लग्न झाले. या दोघांच्या लग्नाला रविवारी चार महिने पूर्ण झाले. रविवारी प्रियांकाचा वाढदिवसही होता. पतीने थाटात आपल्या पत्नीचा वाढदिवस साजरा केला. त्याचवेळी उद्या सोमवती अमावास्या आहे, आपण दोघे सकाळी दर्शनासाठी जाऊ, असे प्रियांकाने सांगितले होते. ही गोष्ट आपल्या प्रियकराला सांगून पतीचा काटा काढण्याचा कटही तिनेच रचला होता. प्रियांका व संशयित आरोपी श्रीधर हे दोघे वर्गमित्र आहेत. या दोघांमध्ये प्रेम जडले. लग्नानंतरही त्यांचे प्रेमसंबंध सुरूच होते. पतीचा काटा काढण्यासाठी प्रियकराला पुढे करून प्रियांकाने हा कट रचल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले असून मुडलगी पोलिसांनी श्रीधर व प्रियांका या दोघांना अटक करून त्यांची कसून चौकशी केली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
प्रियकराला वाचविण्याचा प्रयत्न
आपल्या डोळ्यादेखत पतीचा मुडदा पडला तरी पत्नी निवांत होती. या घटनेसंबंधी पत्रकारांनी प्रियांकाला बोलते केले. ‘तुझ्या पतीचे कोणाशी वैर होते का?’ असा प्रश्न विचारला. यावर ‘घरात सर्व काही ठिक होते. पण बाहेर काही असल्यास मला त्याची माहिती नाही’ असे सांगत प्रियकराला वाचविण्याचा तिने प्रयत्न केला होता. ज्यांनी खून केला त्यांना आपण पाहिले नसल्याचेही ती सांगत होती. शेवटी पोलीस तपासात तीच या कटाचा सूत्रधार निघाली.









