एलअॅण्डटी कंपनीच्या भोंगळ कारभाराचा फटका
बेळगाव : एलअॅण्डटी कंपनीच्या भोंगळ कारभाराचा फटका नागरिकांना व पर्यायाने वाहन चालकांनाही बसत आहे. सोमवारी सकाळी गोवावेस येथील अग्निशमन विभागाच्या कार्यालयासमोरील चरीमध्ये मालवाहू ट्रक अडकला. ट्रकचे वजन अधिक असल्यामुळे तो ट्रक तेथेच चिखलात रुतला. शर्थीचे प्रयत्न करून बऱ्याच वेळानंतर ट्रक बाहेर काढण्यात आला. शहरात बऱ्याच ठिकाणी जलवाहिन्या घालण्याचे काम सुरू आहे. दोन ते तीन महिन्यांपूर्वी मराठा मंदिर कॉर्नरपासून गोवावेसपर्यंत जलवाहिन्या घालण्यात आल्या होत्या. यासाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्यावरच चरी मारण्यात आल्या होत्या. काम पूर्ण झाल्यानंतर चरी बुजविणे गरजेचे होते. परंतु एलअॅण्डटी कंपनीच्या दुर्लक्षामुळे यामध्ये तात्पुरत्या स्वरुपात माती टाकण्यात आली. सोमवारी एक मालवाहू ट्रक रस्त्याशेजारून जाताना या चरीमध्ये अडकला. चर योग्यरित्या बुजविली नसल्याने ट्रक मातीमध्ये रुतला. एका बाजूची दोन्ही चाके रुतल्याने प्रयत्न करूनही ट्रक बाहेर पडत नव्हता. अखेर क्रेनच्या साहाय्याने ट्रक बाहेर काढण्यात आला. परंतु यामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.









