पिरनवाडी येथील नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन
बेळगाव : किरकोळ कारणातून पिरनवाडी येथील अरबाज रफीक मुल्ला (वय 22) या तरुणाचा खून करण्यात आला आहे. या प्रकरणात सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, मृत अरबाजला न्याय देण्यात यावा, मुस्लीम तरुणांना लक्ष्य केले जात आहे. यामुळे कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी, अशा मागणीचे निवेदन पिरनवाडी येथील नागरिकांकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. समाज कंटकाकडून जाणीवपूर्वक मुस्लीम समाजातील तरुणांना लक्ष्य केले जात आहे. अरबाज याचे अपहरण करून निर्घृणपणे त्याची हत्या केली आहे. त्यानंतर त्याचा मृतदेह निर्जनस्थळी टाकला. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. समाजात दुही माजवण्यासाठी काही समाजकंटकांकडून हे कृत्य केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला आहे.
कायद्याची कठोर अंमलबजावणी करा
अशा घटनांमुळे समाजातील शांती व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. कायद्याची भीती नसल्याने मारेकरी खुलेआम फिरत आहेत. याची दखल घेऊन प्रशासनाने अशा घटनाना आळा घालावा व कायदा व सुव्यवस्थेची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणीही करण्यात आली. संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करत ग्रामस्थांनी आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.









