कार चढली दुभाजकावर : वारंवार घडतात घटना : लक्ष देण्याची मागणी
बेळगाव : हिंडलगा-वेंगुर्ला रोडवरील पथदीपांचा प्रश्न संपता संपेना. वारंवार निवेदने व तक्रारी देवून देखील याकडे दुर्लक्ष करण्यात येते आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघात घडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. या रस्त्यावरील पथदीप बंद असल्याने एका कारने दुभाजकाला ठोकरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील पथदीप तातडीने सुरू करावेत, अशी मागणी होत आहे. मध्यंतरी हे पथदीप सुरळीत सुरू होते. काही महिन्यानंतर ते पुन्हा बंद पडले आहेत. आताही ग्राम पंचायतीला याबाबत सांगण्यात आले आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. हिंडलगा कारागृहासमोरच एका कारने दुभाजकाला ठोकर दिली आहे. सुदैवाने या ठिकाणी कोणालाही इजा पोहोचली नसली तरी कारचे नुकसान झाले आहे.
पथदीप तातडीने सुरू करण्याची मागणी
बेळगाव-वेंगुर्ला रोडवर अपघात घडण्याचे प्रकार नित्याचेच पडले आहेत. हिंडलगा जेल समोरील पथदीपांची देखभाल करण्यासाठी ग्राम पंचायतीकडे जबाबदारी देण्यात आली आहे. काही महिने हे पथदीप सुरळीत सुरू होते. त्यानंतर यातील काही पथदीप बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणी दुभाजकावर ट्रक चढला होता. त्यावेळीही सुदैवाने कोणालाही लागले नाही. असे प्रकार नित्याचेच बनले आहेत. त्यामुळे या ठिकाणचे पथदीप तातडीने सुरू करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.









