वृत्तसंस्था/ गॅले
येथे सुरु असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत सोमवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर पाकने दुसऱ्या डावात 5 बाद 221 धावांपर्यंत मजल मारली असून ते अद्याप 91 धावांनी पिछाडीवर आहेत. दरम्यान लंकेने पहिल्या डावात 312 धावा जमविल्या. धनंजय डिसिल्वाचे शतक (122) तसेच मॅथ्यूजचे अर्धशतक ही वैशिष्ट्यो ठरली.
सध्या पाकचा क्रिकेट संघ लंकेच्या दौऱ्यावर आला असून उभय संघात 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान लंकेने 6 बाद 242 या धावसंख्येवरुन सोमवारी दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे शेवटचे 4 गडी 70 धावांची भर घालत तंबूत परतले. 94 धावांवर नाबाद राहिलेल्या धनंजय डिसिल्वाने आपले शतक पूर्ण केले. त्याने 214 चेंडूत 3 षटकार आणि 12 चौकारांसह 122 धावा झळकवल्या. रमेश मेंडिसने 5, प्रभात जयसूर्याने 4, रजिताने 8 धावा जमवल्या. धनंजय डिसिल्वा नवव्या गड्याच्या रुपात बाद झाला. विश्वा फर्नाडोने 28 चेंडूत 28 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 21 धावा जमविल्या. 95.2 षटकात लंकेचा डाव 312 धावांवर उपहारापूर्वीच आटोपला. पाकतर्फे शाहीन आफ्रिदी, नासिम शाह आणि अब्रार अहमद यांनी प्रत्येकी 3 तर सलमानने 1 गडी बाद केला.
उपाहारानंतर पाकने आपल्या पहिल्या डावाला सुरुवात केली. दुसऱ्या षटकात लंकेच्या रजिताने सलामीच्या इमाम उल हकला एका धावेवर झेलबाद केले. प्रभात जयसूर्याने शफिकला डिसिल्वाकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने 3 चौकारांसह 19 धावा केल्या. रमेश मेंडीसने शान मसुदला पायचीत केल्याने पाकवर अधिकच दडपण आले. मसुदने 30 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 39 धावा जमवल्या. प्रभात जयसूर्याने पाकला आणखी एक धक्का देताना कर्णधार बाबर आझमला झेलबाद केले. त्याने 2 चौकारांसह 13 धावा जमवल्या. जयसुर्याने सर्फराज अहमदला 17 धावांवर पायचीत केल्याने पाकची 20.2 षटकात स्थिती 5 बाद 101 अशी होती. त्यानंतर शकिल आणि आगा सलमान यांनी संघाचा डाव सावरताना सहाव्या गड्यासाठी 120 धावांची अभेद्य भागिदारी केली. शकिल 6 चौकारांसह 69 तर सलमान 1 षटकार आणि 6 चौकारांसह 61 धावांवर खेळत आहेत. लंकेतर्फे प्रभात जयसूर्याने 83 धावात 3 तर रजिता आणि रमेश मेंडीस यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – लंका प. डाव 95.2 षटकात सर्व बाद 312 (धनंजय डिसिल्वा 122, मॅथ्यूज 64, समरविक्रमा 36, करुणारत्ने 29, व्ही. फर्नांडो नाबाद 21, शाहिन आफ्रिदी 3-86, नसिम शाह 3-90, अब्रार अहमद 68, सलमान 1-18), पाक प. डाव 45 षटकात 5 बाद 221 (शकिल खेळत आहे 69, सलमान खेळत आहे 61, शफिक 19, शान मसूद 39, बाबर आझम 13, सर्फराज अहमद 17, जयसूर्या 3-83, रजिता 1-33, रमेश मेंडीस 1-63).









