समाजवादी पक्षाला मोठा झटका
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तरप्रदेशातील मागास समुदायाच्या दिग्गज नेत्यांपैकी एक आणि राज्याचे माजी मंत्री तसेच घोसीचे समाजवादी पक्षाचे आमदार दारा सिंह चौहान यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लखनौमध्ये उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य तसेच ब्रजेश पाठक यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आहे.
चौहान यांनी अलिकडेच समाजवादी पक्षाला रामराम ठोकला होता. यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगू लागली होती. दारा सिंह यांनी मागील 6 महिन्यांपासून समाजवादी पक्षाच्या कार्यक्रमांपासून अंतर राखले होते. घोसी मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर ते लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे मानले जात आहे.
दारा सिंह चौहान हे 2017 च्या विधानसभा निवडणुकीत मधुबन मतदारसंघातून विजयी होत मंत्री झाले होते. 2022 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमधून बाहेर पडत समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. घोसी मतदारसंघातून ते विजयी झाले असले तरीही समाजवादी पक्ष सत्तेपासून दूर राहिला होता.









