विठ्ठल भोवती बडवे माजल्याचे कारण देत जुना विठ्ठल बदलून नवा विठ्ठल शोधलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर भक्तांनी गेले दोन दिवस आपल्या जुन्या विठ्ठलाची मनधरणी चालवली आहे. विधानसभा अध्यक्षांनी अजून त्यांना गट म्हणून मान्यता दिलेली नाही. शिवाय आधीच पक्षांतर बंदीचे एक प्रकरण न्यायालयाच्या दरवाज्यात उभे असताना कागदपत्रे करेक्ट चालणाऱ्या पवारांच्या पक्षाबाबत निर्णय घेताना विधानसभा अध्यक्षांना खूप विचार करावा लागणार आहे. अशा काळात ते शिवसेनेप्रमाणे पुन्हा निर्णय घेऊ शकतील अशी शक्यता फार कमी आहे. घेतला तरी पवार तो प्रश्न न्यायालयात घेऊन जातील आणि मग अध्यक्षांकडे कारवाई वाचून पर्याय राहणार नाहीत. अशी स्थिती आहे. पक्षांतर बंदी कायद्यानुसार दोन तृतीयांश बहुमत अजितदादांनी सभागृहात दाखवून दिले तरीसुद्धा राष्ट्रवादी म्हणून त्यांना सभागृहात बसता येणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती वेगळी आहे आणि नऊ मंत्र्यांसह बारा अपात्र करा अशी राष्ट्रवादीने दोनदा बजावलेली नोटीस हा मामला एकदमच वेगळा आहे. अशावेळी ‘काका चला ना’ अशी हाक एखाद्या बालकाने मारावी तशा पद्धतीचे वर्तन राष्ट्रवादी काँग्रेसचे बलाढ्या, बुलंद आणि बलदंड बंडखोर नेते करू लागले आहेत. पक्षात आपले जेष्ठत्व सुप्रिया सुळेंपेक्षा जास्त आहे आणि आपण त्यांच्या हाताखाली काम करू शकत नाही असे म्हणणारे प्रफुल्ल पटेल, शरद पवार आपले दैवत आहेत आणि त्यांचा आशीर्वाद घेण्याचा निर्णय आम्ही घेतला. पक्ष एकसंध ठेवण्यासाठी आपण काही मार्ग काढू अशी विनंती आपण त्यांना केली असे स्पष्टीकरण देत आहेत. या घटनेने शरद पवार यांच्याबाबत असलेली सहानुभूती कमी होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. विरोधकांशी देखील संवाद सुरू ठेवायचा ही पवारांची जुनी परंपरा असली तरी त्यामुळे त्यांच्याविषयी संभ्रम निर्माण होतो. त्यात पुन्हा पंधरा दिवसांपूर्वी अजित पवार यांनी त्यांच्यावर ज्या भाषेत टीका केली आणि त्यांच्या एकूण राजकारणाचा एक पदर उलगडून दाखवला त्यातून पवारांचे राजकारण बेभरवशी असल्याच्या टीकेवर घरचे शिक्कामोर्तब झाले होते. तरीही शरद पवारांच्या विषयी महाराष्ट्रात सहानुभूती आहे. येवल्याची सभा हे त्याचेच द्योतक. अशा परिस्थितीत भले पहिल्या दिवशीच जयंत पाटील यांनी शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही असे सांगितले तरी खुद्द जयंत पाटील यांच्या बाबतीत जलसंपदा खाते त्यांची वाट पाहत आहे अशी हवा उठलेली असल्यामुळे खरे वाटत नाही. अजित पवार आणि त्यांचे समर्थक असे अचानक यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये येऊन भेटतात. अजित पवार आपल्या काकींच्या शस्त्रक्रियेनंतर सिल्वर ओकवर जातात हे राजकारण विरहित आहे असे आज तरी म्हणता येत नाही. ज्या काळजीने ते काकींना भेटायला गेले ती काळजी त्यांनी शरद पवार यांना घरी बसा, निवृत्त व्हा असा सल्ला देताना कुठे गेली होती? जे प्रफुल्ल पटेल पुन्हा एकदा पवारांना दैवत म्हणत आहेत त्यांनीच एक पुस्तक लिहून पवारांची गुपिते बाहेर काढण्याचा इशारा दिला होता हे जनता कसे विसरेल? पवारही याबाबत खुलासा करण्यासाठी पुढे आलेले नाहीत. गेल्या अनेक वर्षांचा अनुभव लक्षात घेता शरद पवार कोणत्याही टीकेला उत्तर देत नाहीत किंवा कोणत्याही गोष्टीवर थेट प्रतिक्रिया व्यक्त करत नाहीत. आपण बेंगळूरला विरोधकांच्या बैठकीस गेल्यानंतर तो संकेत संभ्रम दूर होण्यास पुरेसा होईल असे त्यांना वाटत असावे. पण या कृतीनंतर भाजप विरोधात एकत्र आलेले 23 पक्ष शरद पवारांकडे संशयानेही पाहू शकतात. सलग दोनवेळा अजित पवार यांच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी शरद पवारांना सहज जाऊन भेटणे हे इतके सोपे नाही. पवार कुठे आहेत याची माहिती घेऊन ते अचानक येतात असे मानणे मजेशीर असेल. एकतर अजित पवारांसह बंडखोरांना शरद पवारांची विश्वासार्हता अजून कमी करायची असेल. आमच्याजवळ बहुमत आहे, अजून बरेच लोक आम्ही फोडू शकतो. आपला पक्ष सत्तेशिवाय चालू शकत नाही. त्यामुळे तुमच्या सोबत असलेले लोकसुद्धा आमच्यासोबत येतील. त्यामुळे तुम्ही जास्त आढेवेढे न घेता आमच्याबरोबर चला असे ते गोड भाषेत सांगत असावेत. किंवा त्यांना खरोखरच शरद पवार यांच्या खेळीची भीती वाटू लागली असावी. हे बंड आपण तीन महिन्यात उलटवून दाखवू असा विश्वास शरद पवार यांनी यापूर्वी व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने बारा आमदारांच्यावर कारवाई करण्याचे त्यांचे दुसरे स्मरणपत्र गेल्याने या बंडखोर आमदारांच्या पायाखालील वाळू सरकली असावी. पण हे सगळे ज्या पद्धतीने सुरू आहे आणि पवार आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत. त्यामुळे पवार या सर्वांना समजून घेणार आणि त्यांच्यासोबत भाजपबरोबर जाणार असा एक प्रवाह आहे. तर दुसरा प्रवाह पवारांची विश्वासार्हता कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगणारा आहे. एकदा आपला विठ्ठल बदलल्यानंतर आणि येवल्याच्या सभेनंतर भुजबळ यांनी ज्या पद्धतीची टीका शरद पवार यांच्यावर केली आहे त्यानंतर त्यांनी पुन्हा पवारांचा उंबरठा झिजवणे योग्य नाही. मात्र आज राजकारणाला काही धरबंदच राहिलेला नसल्याने अशा प्रकारची कोणतीही कृती अनैतिक मानली जात नाही हे विशेष आहे. पंधरा दिवसांपूर्वी आपण बंडखोरी केली आहे, आपण आपल्याच नेत्यावर चिखलफेक करून त्याला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता पुन्हा त्याच्या पायावर लोटांगण घेत आहोत आणि तरीही आपण पक्ष एकसंध ठेवण्याची भाषा करत आहोत याचे या मंडळींना काहीही वाटत नाही. हे दुर्दैवच. तपास यंत्रणांच्या भीतीने सरकार बळकट करायला गेलेल्या मंडळींना असा उपद्व्याप का करावा लागत असावा? त्यामुळे पवारांची कारवाई थांबणार आहे का? नसेल तर ही मनधरणी अजितदादांची सहानुभूती वाढवण्यासाठी आहे हे म्हणणे हास्यास्पदच म्हणावे लागेल. भाजपला अजित पवार नव्हे तर शरद पवार हवे आहेत का? आणि इतकी सहानुभुती मिळाली असताना शरद पवार त्यांच्याबरोबर जातील का?
Previous Articleसर्वात वेदनादायी आजाराने ग्रस्त मुलगी
Next Article ‘चांद्रयान-3’ आज तिसऱ्या कक्षेत
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








