अध्याय अठ्ठाविसावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, विषयसेवनातून आनंद मिळतो ही सर्वसामान्य माणसाची कल्पना असते. पण साधकाला हे माहित असते की, मुळातच मिथ्या आणि मायिक असलेले विषय भोगताना जर आनंद होत असेल तर तो नित्यमुक्त झालेला नसतो. अशा परिस्थितीत केलेले विषयसेवन त्याला बाधक होते. म्हणून साधकाला विषयसेवनातून आनंद मिळतो ही कल्पना नष्ट होण्यासाठी देहाचा अभिमान त्यागावा लागतो. देहाभिमानामुळे मी म्हणजे हा देह होय ही कल्पना मनात घट्ट रुतून बसलेली असते. त्यामुळे विषय आणि आपण एक असल्याचा भास होत असतो. त्यातूनच विषयसेवनात आनंद आहे अशी खात्री वाटत असते. प्रत्यक्षात आपण आत्मस्वरूप असून सध्या धारण केलेल्या देहापेक्षा वेगळे आहोत हे लक्षात घेतले तर देहाचा अभिमान आपोआप गळून पडतो. परंतु हे एव्हढे साधे सरळसोपे नसते कारण मी देहाभिमानाचा त्याग करीन असे कुणी स्वत:च्या भरवशावर म्हणू लागला तर त्याला ते शक्य होत नाही कारण त्याचा जन्मजात स्वभाव त्याच्या आड येतो. बहुतांशी लोकांच्या स्वभावात रजोगुण प्रभावी असतो. त्यामुळे विलासाची, ऐशोआरामाची माणसाला मनापासून आवड असते व ती सहजासहजी नष्ट होण्यासारखी नसते. हे लक्षात घेऊन स्वभावात बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने माझे भजन साक्षेपाने म्हणजे निश्चयाने करावे. त्यात खंड पडू देऊ नये. अत्यंत भक्तीभावाने माझे भजन केल्याने देहाभिमान समूळ नाहीसा होतो. परब्रह्म भक्तीच्या आधीन असल्याने सर्व साधनात भक्ती हे उत्तमोत्तम साधन आहे. भक्तीतून काय मिळते, असे विचारशील तर ज्ञान, वैराग्य, निवृत्ती, धृती, शांती, ब्रह्मस्थिती हे सर्व भक्ती केल्याने प्राप्त होते. तेव्हा भक्ती हीच वरील सर्व गोष्टींची जननी आहे असे म्हणालास तरी चालेल. एव्हढेच काय चारही मुक्तींच्याही वरती भक्तीचे स्थान आहे. अशी माझ्या भक्तीची अनिवार शक्ती असल्याने जो माझी भक्ती करतो त्याला मी वश झालोच म्हणून समज. माझे स्वरूप अनंत आणि अपार आहे हे तुला माहित आहेच परंतु असा अनंत आणि अपार असलेला मी, माझी भक्ती करणाऱ्याच्या पूर्णपणे हातात येतो. मझ्या भक्तांवर माझे इतके प्रेम असते की, त्यांच्या दारात मी तिष्टत उभा असतो. मी पूर्णपणे भक्ताच्या आधीन असतो. विशेष सांगण्याची गोष्ट म्हणजे माझ्या भक्तीचा महिमा अजून माझ्याही संपूर्णपणे लक्षात आलेला नाही. माझी भक्ती करून बहुतेक भक्त चारही मुक्तींना बाजूला सारून मोक्षाची मागणी करतात. कारण त्यांना हे माहित असते की, माझ्या भक्तीचा महिमा एव्हढा आहे की, चारही मुक्ती माझ्या भक्ताच्या पायाशी लोळण घेत असतात. त्यामुळे जो माझी भक्ती करतो तो धन्य होतो. म्हणून जो माझी भक्ती करतो त्याला मी सर्वस्वी विकला जातो. भगवंतांचे हे मनोगत गदिमांनी बरोबर जाणले होते. त्यामुळे असंख्य भक्तांच्या मनातले विचार त्यांनी काव्यबद्ध केले ते असे, नाही खर्चली कवडी दमडी, नाही वेचला दाम, विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम धृ. ।।कुणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी, जन्मभरीच्या श्वासाइतुके, मोजियले हरी नाम।। बाळ गुराखी यमुनेवरचा, गुलाम काळा संता घरचा, हाच तुक्याचा विठ्ठल आणि दासाचा श्रीराम ।।2।। जितुके मालक, तितकी नावे, हृदये जितकी याची गावे, कुणी न ओळखी तरीही याला, दिन अनाथ अनाम।।3।। गदिमांच्या ह्या भावपूर्ण गीतानंतर भगवंत पुढे काय म्हणाले ते जाणून घेऊयात. ते म्हणतात, भक्ती हेच देहाचा अभिमान घालवण्यासाठी मुख्य साधन असल्याने जो भक्त माझी निस्सीम भक्ती करत असतो त्याच्या मी आधीन होऊन राहतो. तो सांगेल त्याप्रमाणे वागतो. त्याच्या वचनाचे मी कधीच कणभरही उल्लंघन करत नाही. त्यांनी जर मला सगुण हो असे सांगितले तर मी त्यांच्यासाठी सिंह, वराह अशी रूपे घेतो. मी स्वत: विदेही असलो तरी त्यांच्यासाठी मी देहधारी होतो.
क्रमश:








