राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून मुंबईत सुरूवात झाली. राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर होत असलेले हे पहिले अधिवेशन आहे. सत्ताधारी पक्षाकडून आता कोणी विरोधकच नसल्याचा दावा केला जात आहे. विधानसभेत तर विरोधीपक्ष नेताही नाही. शिंदे गटातील मंत्र्यांच्या तुलनेत राष्ट्रवादीतील अजित पवार गटातील मंत्री हे ज्येष्ठ आणि अनुभवी आहेत तसेच गेल्या काही दिवसात राजकारणात झालेले भूकंप लक्षात घेता काहीही होऊ शकते. त्यामुळे कुणालाही अंगावर घेण्याच्या मानसिकेतेत आमदार नसल्याचे पहिल्याच दिवशी दिसले तर या अधिवेशनात एकाच पक्षाचे दोन गट पडलेले राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांचे दोन्ही गटाचे आमदार आणि नेते एकमेकांसमोर उभे ठाकणार का? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कालपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनापेक्षा अजित पवार आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांनी सलग दुसऱ्या दिवशी शरद पवारांची भेट घेणे याचीच चर्चा अधिक सुरू आहे. अजित पवार यांच्यासोबत एकूण 30 आमदार आहेत. तसेच काही मंत्रीही आहेत. अजित पवार यांच्यासह 9 जणांनी शिंदे सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. शरद पवार गटाने या आमदारांना अपात्र करण्याची विनंती करणारं पत्र विधानसभा अध्यक्षांना दिलं आहे. त्यामुळे अजित पवार गटाचा पेच वाढला आहे. या मंत्र्यांना अपात्र करू नये. काही तरी तोडगा काढावा ही मागणी करण्यासाठी हे सर्व आमदार शरद पवार यांच्याकडे आले असल्याचं सांगितलं जात आहे. मंत्री अपात्र होऊ नये अशी भीती अजित पवार यांच्या मनात असल्यानेच त्यांनी शरद पवार यांची सलग दुसऱ्या दिवशी भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, आज आमदार भेटायला येणार असल्याची माहिती शरद पवारांना नव्हती, असंही सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे शरद पवार हे उद्या बंगळूरू येथे होणाऱ्या विरोधीपक्षाच्या बैठकीसाठी उपस्थित राहणार असल्याचे समजते आधी शरद पवार हे या बैठकीसाठी उपस्थित राहणार नसल्याचे सांगण्यात येत होते. गेल्या महिन्यात पाटण्यात झालेल्या विरोधीपक्षाच्या बैठकीला महाराष्ट्रातील शरद पवार, उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच इतर महत्त्वाचे नेते उपस्थित राहिले होते. त्यानंतरच काही दिवसात महाराष्ट्रात राष्ट्रवादीत फुट पाडण्याचा डाव आखण्यात आल्याचे बोलले जाते. आता उद्याच्या बैठकीला शरद पवार यांनी उपस्थित राहू नये यासाठीसुध्दा अजित पवार आणि त्यांच्या गटाचे आमदार मंत्री साहेबांना सांगायला गेले असतील कारण लोकांमध्ये शरद पवार हेच अजित पवार यांच्या बंडाच्या मागे असल्याचे बोलले जात आहे. जर शरद पवार हे उद्याच्या बैठकीला हजर राहिले तर शरद पवार यांची भूमिका भाजप विरोधी असल्याचे सिध्द होणार आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधीपक्षातील केवळ काँग्रेस आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सरकार विरोधात आक्रमक दिसले, राष्ट्रवादी पक्षाचा एकही आमदार नसल्याने स्वाभाविक पूर्वीसारखा जोश आणि कल्पकता कालच्या सरकारविरोधी आंदोलनात दिसली नाही. राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे हे नेहमीच सरकार विरोधी आंदोलनात घोषणा देण्यात आघाडीवर असायचे. मात्र दोनच दिवसापूर्वी तुपे यांनी आपल्या व्ट्टिर अकाऊंटवर आपण आत्तापर्यंत एकाही अधिवेशनाला गैरहजर राहिलो नाही मात्र आता या अधिवेशनाला प्रकृती अस्वास्थामुळे गैरहजर राहावे लागत असून अजुन काही दिवस डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्याचे तुपे यांनी व्हिडीओव्दारे बेलताना सांगितले. हेच तुपे शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकाच दिवशी झालेल्या बैठकीच्या वेळी शरद पवारांच्या बैठकीला हजर होते आणि नंतर दुसऱ्या दिवशी अजित पवारांना जाऊन भेटले. त्यामुळे तुपे यांचा आजार हा राजकीय असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण राष्ट्रवादीच्या आमदारांची परिस्थिती ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी झाली आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीच्या आमदारांनी सेफ भूमिका घेतल्याचे बघायला मिळाले कारण ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे गटातील आमदारांवर अपात्रतेची कधीही कारवाई होऊ शकते तर अजित पवारांसोबत गेलेल्या 12 आमदारांना शरद पवार गटाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून 15 जुलैला दुसरी नोटीस बजावण्यात आली आहे. आमदारांना उत्तर देण्यासाठी केवळ 48 तासाचा अवधी देण्यात आला आहे. त्यामुळे आमदारांना माहीत आहे केव्हाही काहीही होऊ शकते. त्यातच शरद पवारांनी अजित पवारांच्या बंडानंतर मी 3 महिन्यात संपूर्ण खेळ पलटवणार, सर्व आमदार परत येतील असा दावा केला होता. अजित पवारांनी वांद्रे येथील एमआयटी येथे झालेल्या मेळाव्यात ज्या पध्दतीने शरद पवारांच्यावर आरोप करताना एका मागून एक गौप्यस्फोट केले त्यातून शरद पवारांच्या प्रतिमेलाच मोठा तडा गेला. अजित पवार यांनादेखील आपल्या काकांचा करिष्मा माहीत आहे, गेली 65 वर्षे शरद पवार हे संसदीय राजकारणात आहेत. त्यामुळे शरद पवार विधीमंडळाचे नियम आणि कायदे कोळून प्यायले असल्याने अजित पवारांसोबत गेलेले आमदारही थोडे दबकून असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर विरोधकाकडून सर्वसामान्यांच्या प्रश्नापेक्षा सरकार कसे घटनाबाह्य आहे, 50 खोके एकदम ओके या घोषणा देत सरकार विरोधात आंदोलन केले गेले. काल पहिल्या दिवशी पण कलंकित घटनाबह्य सरकारचा धिक्कार असो असा
बॅनर घेऊन विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणा देण्यात आल्या. गेल्या काही वर्षातील अधिवेशन बघता सरकारच्या विरोधात आंदोलन करायचे, सरकारची प्रतिमा मलिन करण्याकडे विरोधकांचा कल दिसून येतो. मात्र सर्वसामान्यांच्या प्रश्नांचा विसर पडला असून आता इथुन पुढे तीन आठवडे तरी शेतकरी, विद्यार्थी, महिला यांच्या प्रश्नांबाबत विरोधकांनी आक्रमक होऊन राज्यातील जनतेला या अधिवेशनाच्या माध्यमातून न्याय मिळावा ही अपेक्षा !
प्रवीण काळे








