नवी गाडी 115 किमीचे मायलेज देणार
वृत्तसंस्था/ बेंगळूर
इलेक्ट्रिक दुचाकींमध्ये स्पर्धक कंपनी एथर एनर्जी आगामी काळात आपली नवी एनर्जी 450 एस ही इलेक्ट्रिक दुचाकी सादर करणार आहे. सदरची दुचाकी ही ओलाच्या एस 1 ला टक्कर देईल, असे म्हटले जात आहे. या गाडीची किंमत अंदाजे 1.29 लाख इतकी असणार असून 3 ऑगस्ट रोजी भारतीय रस्त्यावर उतरवली जाणार असल्याची माहिती मिळते आहे.
एकाच चार्जवर ही एथरची नवी गाडी 115 किलोमीटरचे अंतर कापू शकणार असल्याचा दावा कंपनी करते आहे. आपल्या अधिकृत संकेतस्थळावर कंपनीने प्री-बुकिंगला सुरुवातही केली आहे. ग्राहकांना ही गाडी हवी असेल तर 2500 रुपये आगाऊ भरुन गाडी बुक करता येऊ शकते. अलीकडेच या नव्या गाडीबाबत कंपनीने टीझर प्रदर्शित केला होता. यात मायलेज, टॉप स्पीड व किमतीबाबत खुलासा करण्यात आला आहे.
गाडीची सुरुवातीची किंमत 1 लाख 29 हजार 999 रुपये राहणार असून स्कूटर 0 ते 40 किलोमीटरचा वेग केवळ 3.9 सेकंदात प्राप्त करणार आहे. टॉप स्पीड 90 कि.मी. प्रति तास इतका असेल. पण या गाडीत टचस्क्रीन मात्र नसणार असून त्याजागी एलसीडी डिस्प्ले मिळणार आहे.









