अतिक्रमण कायम करण्याच्या मागणीसाठी उद्या मुंबईत विराट मोर्चा; आझाद मैदानावरून सुरु होणार मोर्चा
कोल्हापूर प्रतिनिधी
देशातील गोरगरीबांच्या जमिनी हिसकावून घेऊन अतिक्रमणाच्या नावाखाली त्यांना भूमिहीन करण्याचा डाव सरकारने आखलेला आहे. एकाही अतिक्रमणधारकाची जमिन आम्ही जाऊ देणार नाही. गायरान, गावठाण व वन विभागातील जमिनीवरील अतिक्रमणे कायम कराव्यात, या मागणीसाठी 19 जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदान ते विधानभवन असा प्रागतिक पक्षांच्या सर्व घटक पक्षांच्यावतीने विशाल मोर्चा आयोजित केला असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली.
शेट्टी म्हणाले की, देशात व महाराष्ट्रात स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून लाखो गरीब लोक भूमिहिन असून इंग्रज सरकारने, हैद्राबाद निजामांनी सुध्दा गोरगरीब लोकांना सरकारी जमिनी, वतने, इनाम दिलेल्या होत्या. तेच लोक आज महाराष्ट्र सरकारने अतिक्रमणधारक ठरविले आहेत. राज्यातील लाखो गोरगरीब भुमिहिनांना अतिक्रमणधारक ठरवून पुन्हा या जमिनी धनदांडग्यांच्या घशात घालण्याच्या सरकारी षडयंत्राचा आम्ही तीव्र निषेध करतो. त्याचबरोबर पहिल्यांदा धनदांडग्याची सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे शासनाने हटवावीत. भूमिहिनांचे घर व वहिवाटी शेती हक्काचे संरक्षण करावे. लाखो कुटूंबे गायरान, गावठाण, वनविभाग जमिनिवरील पिढयानपिढ्या वर्षांनुवर्षे राहतात. घर व शेती करून पोट भरणाऱ्या भुमिहिनांना जमीन वाटप व्हावे. त्या जमिनिचा सातबारा त्यांच्या नावे व्हावा, या प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील गायरान व सरकारी जमिनीवरील अतिक्रमणधारक संघटना राज्यभर एकत्रीत आले आहेत.
शेट्टी म्हणाले, बी. आर. एस.पी. सी.पी.आय, सी.पी.आय. (एम.), शेकाप, स्वाभिमानी पक्ष, जनता दल (सेक्युलर) समाजवादी पार्टी, आर.पी.आय. (सेक्युलर), एकलव्य सेना, लाल निशान पक्ष, बहुजन विकास आघाडी, सी.पी.आय. (एम.एल) सत्यशोधक कम्यूनिस्ट पार्टी या पक्षांनी सक्रीय पाठींबा जाहीर केलेला आहे. पक्ष कार्यकर्ते सुध्दा मोठया संख्येने या मोर्चात सामिल होणार आहेत. या पक्षाचे आमदार देखील या प्रश्नांला विधानसभेत वाचा फोडणार आहेत. राज्यातील सर्व अतिक्रमण धारकांनी 19 जुलै रोजी हक्काच्या लढाईसाठी मुंबईतील आझाद मैदानावर हजर रहावे, असे आवाहन शेट्टी यांनी केले आहे.