आज दीप अमावस्या आहे पण ही अमवस्याला दीप अमावस्यापेक्षा गटारी अमावस्या म्हणून चुकीच्या पद्धतीने ओळखली जाते मात्र मूलतः ती गटारी नसून गताहारी अमावास्या आहे. याला आषाढ अमावास्या किंवा भीम अमावस्या असेही म्हंटले जाते.
अलीकडच्या काळात गटारी अमावस्या म्हणून दारू आणि मांसाहाराचा बेत काही तरुण मंडळींकडून आखण्यात येतो पण यामुळे दीप अमावास्येचे महत्व कुठे ना कुठे हरविलेले दिसत आहे. गटर हा शब्द इंग्रजी असून अशुद्ध जलसंवहन करण्यासाठी हा प्रतिशब्द आहे. भारतीय सण हे नेहमी हिंदू संस्कृती, कर्मकांड यामध्ये व्यापलेले आहे. हा पवित्र दिवस आहे. पावसाळ्यात गढूळ पाण्याने रोगराई पसरण्याचा धोका संभवतो ते टाळण्यासाठी स्वल्प आहार आणि शाकाहार अवलंबिला जातो. उपवास म्हणजेच गताहार. गत म्हणजे गेलेला आहार. वर्षभर मांसाहार केला जातो पण दीप अमावास्ये नंतर का खाऊ नये ? याच्या मागे नुसतेच धार्मिक कारण नसून,त्याला वैज्ञानिक जोड आहे.

पावसाळ्यात मांसाहार नीट पचत नाही.
बहुतेक प्राण्यांचा हा विणीचा / प्रजननाचा काळ असतो. या काळात प्राण्यांची हत्या केली तर नवीन प्राणी जन्मालाच येणार नाहीत. मग वर्षभर मांसाहार प्रेमींना खाण्यास मास मच्छी मिळणार तरी कुठून ? याचा साऱ्या निसर्गचक्रावर विपरीत परिणाम होतो. हल्ली मत्स्यदुष्काळ वगैरे शब्द ऐकू येऊ लागले आहेत. त्यामुळे कोळीबांधव या काळात मासेमारी करीत नाहीत आणि सरकारी पातळीवरूनही मासेमारीवर बंदी घालण्यात येते.
विविध साथी व आजार या रोगजंतूंमुळेच होतात, हे आपण पाहत आलो आहोत. अशा प्रकारे आपण जंतुसंसर्गाची शक्यता टाळली तर आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यास थोडा अधिक मदत मिळतो.
गटारी ही वाईट प्रथा सध्या मद्यपी लोकांनी सुरु केलीली प्रथा आहे. जी अत्यंत चुकीची आणि घाणेरडी आहे. कारण या दिवशी घरातील महिला संध्याकाळी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून देवाजवळ ते दिवे प्रज्वलित करतात. आपल्या घरादाराची उन्नती होऊदेत, संसार सुखाचा होऊदेत म्हणून पूजा अर्चना करतात आणि जर त्याचं घरातील पुरुष मंडळी जर या गटारीच्या नावाखाली दारू पिऊन घरी आल्यास देवांचा आशीर्वाद मिळणार तरी कसा? हे योग्य नसून दीप अमावस्या बद्दल जाणून घेणे योग्य ठरेल.









