ऑनलाईन टीम / मुंबई :
विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, प्रा. मनीषा कायंदे आणि विप्लव बजोरिया यांच्याविरोधात ठाकरे गटाने अपात्रतेची नोटीस बजावली आहे. विधीमंडळ सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडे ही नोटीस देण्यात आली आहे.
गोऱ्हे, कायंदे आणि बजोरिया या विधान परिषदेच्या आमदारांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला आहे. पक्षांतर बंदी कायद्यात हे बसत नसल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करा, अशी उद्धव ठाकरे गटाची मागणी आहे. ठाकरे गटाने पाठविलेल्या अपात्रतेच्या नोटीसला पुढील 14 दिवसात या तिघांनाही उत्तर द्यावे लागणार आहे.
गोऱ्हेंना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही
गोऱ्हे यांच्याविरोधात आम्ही अपात्रतेची नोटीस काढली आहे. त्यांनी उपसभापती पदावर राहू नये. त्यांना तो नैतिक अधिकार राहिलेला नाही. या विरोधात आम्ही सभागृहात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. पण उपसभापती आणि सरकारने आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, असे ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी म्हटले आहे.