कामात भ्रष्टाचार झाल्याचा संशय : शेतकरी आक्रमक : सरकारने चौकशी करण्याची मागणी
पेडणे : कोनाडी तेरेखोल नदीच्या किनारी असलेल्या शेतमाळ्याला संरक्षण देण्यासाठी व खारेपाणी शेतात येऊ नये यासाठी जलस्रोत खात्यातर्फे सुमारे तीन कोटी ऊपये खर्च करून बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीचा दर्जा निष्कृष्ट आहे. याकामात भ्रष्टाचार झाला असून याची चौकशी सरकारने करावी व कंत्राटदाराला कळ्या यादीत टाकावे, अशी मागणी कोनाडी येथील शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली. पत्रकार परिषदेला शेतकरी राहुल भगत, माजी सरपंच मोहन आरोलकर, कोरगावचे माजी उपसरपंच आनंद कोरगावकर व शेतकरी उपस्थित होते.
या भागात 2019 साली संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाची निविदा काढली आणि हे काम फोंडा येथील कंत्राटदाराने घेतले. मानस बांधणे तसेच पाण्याचा निचारा होण्यासाठी वाट ठेवणे गरजेचे होते. त्या वाटा न ठेवता तसेच मानस न बांधता हे काम आटपून कामाचे बिल मंजूर केले. या कामाचा दर्जा निकृष्ट आपल्या लक्षात आल्यानंतर माहिती अधिकार कायद्याखाली माहिती घेतली. निविदेमध्ये उल्लेख केलेल्या गोष्टाची पूर्तता न केल्याने तसेच मळ्यातील पाणी निचरा होण्यासाठी मानस बांधली नसल्याचे असे शेतकरी राहुल भगत यांनी सांगितले. या भागाचे पंचायत सदस्य अब्दुल नाईक यांची जमीन नदीकाठी आहे. शेतमळ्याला बांधण्यात आलेली भिंत वळवून अब्दुल नाईक यांनी आपल्या जागेला संरक्षण दिले आहे. हे काम अयोग्य असल्याने शेतमाळ्यात पाणी शिरत असून शेतजमीन वाया जाण्याची भीती आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून अनेक ठिकाणी भिंत मोडकळीस आली आहे. काही ठिकाणी खडी दिसत आहे. सिमेंटचा पत्ता नाही. आमची शेती वाया जाणार असल्याची भीती राहुल भगत यांनी व्यक्त केली. शेतात कंत्राटदराने भले मोठे दगड टाकले आहेत. इतर साहित्य सर्वत्र विखुरले आहे. मशीन घालून शेत नांगरणी करणे अवघड बनले आहे. सरकारने याची दखल घ्यावी, अशी मागणी शेतकरी श्रीमती जोशी यांनी केली.
कामाची सखोल चौकशी व्हावी : आरोलकर
अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम दिसून येत आहे. ही भिंत वाहून जाणार असल्याची भीती आहे. या कामात भ्रष्टाचार झाल्याचा संशय असून त्याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी माजी सरपंच मोहन आरोलकर यांनी केली.
कामाला जबाबदार कोण? : कोरगावकर
ही संरक्षण भिंत व्हावी यासाठी उपसरपंच असताना प्रयत्न केले होते. मात्र त्यानंतर हे काम सरकारने हाती घेतले. शेतात नदीचे खारे पाणी येऊ नये यासाठी ही भिंत मजबूत होणे गरजेचे होते. मात्र संरक्षक भिंतीचा दर्जा निकृष्ट असून सिमेंटचा पत्ता नाही. आता या कामाला जबाबदार कोण? सरकारने कामाची पाहणी करून चौकशी करावी, अशी मागणी कोरगावचे माजी उपसरपंच आनंद कोरगावकर यांनी केली आहे.









