अनेक गैरकृत्यांना वाव : युवक अमलीपदार्थाच्या व्यसनाधिनात
खानापूर : शहरात आणि बेळगाव-गोवा रस्त्यावर गेल्या दोन वर्षांपासून काही कॅफे सुरू करण्यात आले आहेत. या नव्या कॅफेत कॅफेची रचना पूर्णपणे वेगळ्या पद्धतीची आहे. शहरात असे सात-आठ कॅफे सुरू करण्यात आले असून, यात चहा व इतर खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या कॅफेतून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ रहात होती. त्यामुळे या ठिकाणी काही गैरकृत्ये सुरू असल्याची चाहूल अनेकांना लागली होती. याबाबत पोलिसाना माहिती देण्यात आली. पोलिसानी या ठिकाणी नुकतीच धाड टाकून तपासणी केली असता छोट्याशा जागेत टेबल खुर्ची उपलब्ध करून तरुण, तरुणींना चहाच्या माध्यमातून भेटण्याची संधी देण्यात येत होती. जेव्हा पोलिसानी धाड टाकली. तेव्हा काही कॅफेमध्ये बरेच तरुण, तरुणी आढळून आल्याने पोलिसानी कॅफे मालकाना धारेवर धरले असता मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आल्याचे सांगण्यात आले. पोलिसानी कॅफे मालकांना या पुढे जर तरुण तरुणींची एकाचवेळी गर्दी झाल्यास कॅफेवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
तरुण, तरुणींमध्ये वाद
खानापूर शहरात अशा कॅफेमुळे वातावरण गढूळ होत असून तरुण, तरुणींमध्ये जोरदार वाद होत आहेत. तसेच शहरात गांजासह इतर नशावर्दक पदार्थांची विक्रीही मोठ्या प्रमाणात होत असून, शहरासह परिसरातील युवकांमध्ये व्यसनाधिनता वाढली आहे. त्यामुळे अनेक पालक हतबल झाले आहेत.
व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी मार्गदर्शनाची गरज
गेल्या काही वर्षात अनेक तरुणाना आपला जीवही गमवावा लागला आहे. किशोरवयीन मुले तसेच व युवा वर्ग अमलीपदार्थांच्या व्यसनाधिनतेकडे मोठ्या प्रमाणात वळल्याने युवा पिढीचे जीवनच धोक्यात आले आहे. यासाठी शहरात पोलिसाकडून कठोर कारवाईची गरज व्यक्त होत आहे. तसेच किशोरवयीन व तरुणांना या व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी मार्गदर्शनाची तसेच समुपदेशनाची गरज आहे.









