आहार हक्क आंदोलन कार्यकर्त्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
बेळगाव : राज्य सरकारकडून अन्नभाग्य योजनेंतर्गत गोर-गरिबांसाठी तांदूळ वितरित करीत आहेत. सदर योजनेतून तांदळासह खाद्यतेल, गूळ, पौष्टिक आहाराचे वितरण करावे, अशी मागणी आहार हक्क आंदोलन कार्यकर्त्यांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली. गॅरंटी योजनेंतर्गत राज्य सरकारने अन्नभाग्य योजनेमधून दहा किलो तांदूळ देण्याची घोषणा केली होती. मात्र काही अपरिहार्य कारणास्तव पाच किलो तांदूळ ऐवजी पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे. रेशनकार्डधारकांच्या बँक खात्यावर थेट पैसे जमा केले जात आहेत. सरकारने असे न करता त्याऐवजी खाद्य तेल, गूळ, पौष्टिक आहार द्यावा, अशी मागणी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून केली आहे.
ज्वारी, नाचणा, गहू, गूळ वितरण करा
राज्यातील 15 जिल्ह्यातील नागरिकांशी चर्चा करून यावर अनेकजणांनी उपरोक्त मागणीला प्रतिसाद दिला आहे. सकस अन्नाअभावी कुपोषण वाढत आहे. त्यासाठी महिला व मुलांना पौष्टिक आहार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने अन्नभाग्य योजनेतून पौष्टिक धान्यांसह गूळ, तेल या खाद्यपदार्थाचे वितरण करावे. यामुळे कुपोषण दूर होईल. केरळ सरकारकडून सदर योजना राबविली जात आहे. याच धर्तीवर राज्यामध्येही योजना राबविण्यात यावी. राज्य सरकारने पौष्टिक आहाराची गरज लक्षात घेऊन ज्वारी, नाचणा, गहू, गूळ वितरण करावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी शारदा गोपाल, शिवाजी कागणीकर, किरण बिडी, सुवर्णा कुठ्ठाळे, कविता जारकीहोळी आदी उपस्थित होते.









