वार्ताहर /किणये
यंदा म्हणावा तसा दमदार पाऊस झाला नाही. यामुळे शेतकरीवर्ग चिंतेत होता. बऱ्याच दिवसानंतर शुक्रवारी सायंकाळपासून ते शनिवारी दिवसभर तालुक्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस झाला. यामुळे इनाम बडस-बेळवट्टी भागातील शेतकरी भातरोप लागवडीच्या कामांमध्ये व्यस्त झाले आहेत. पावसाने हुलकावणी दिली असल्यामुळे शिवारात पाणी साचले नाही. यामुळे सर्वांच्या नजरा आभाळाकडे लागून राहिल्या होत्या. पाऊस कधी येणार, याचीच बळीराजा वाट बघत होता. बऱ्याच प्रतीक्षेनंतर तालुक्याच्या पश्चिम भागात शुक्रवारी सायंकाळपासून दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे शेतशिवारांमध्ये थोड्याफार प्रमाणात पाणी साचले आहे. शेतात पाणी साचल्यामुळे भातरोप लागवड करण्यासाठी शेतकरी पॉवर ट्रिलरच्या साह्याने चिखल व मशागत करू लागले आहेत. इनामबडस, बेळवट्टी, राकसकोप, सोनोली, यळेबैल, बोकनूर भागातील शेतकरी सध्या जे शिवारात पाणी साचले आहे. त्यामध्ये चिखल करून भातरोप लागवड करताना दिसत आहेत. केवळ पाणथळ शिवारात पाणी साचू लागले आहे. तसेच काही शेतकरी विहिरी व कूपनलिकांचे पाणी देऊनही रोप लागवड करू लागले आहेत. तालुक्याच्या पश्चिम भागात सर्रास भातरोप लागवडीसाठी अजूनही दमदार पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
कंग्राळी बुद्रुक परिसरात पंपसेट्द्वारे पाणी सोडून रोपलागवड
कंग्राळी बुद्रुक : तरण्या पावसाचे नक्षत्र संपत आले तरीसुद्धा शिवारात पाण्याचा एक थेंब साचले नाही. पावसावरील भरोसा सोडून शिवारात विहिरी असलेल्या शेतकऱ्यांनी पंपसेटने पाणी सोडून पॉवर ट्रिलरने चिखल करून भातरोप लागवड सुरू केली आहे. परंतु हे पाणी थोड्या वेळातच जमिनीत मुरत असल्यामुळे ऐन पावसाळ्यातही शेतकरीवर्गाला दमदार पावसासाठी आकाशाकडेच पाहावे लागत असल्याचे चित्र तालुक्यामध्ये दिसत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शिवारामध्ये विहिरी आहेत ते विहिरीच्या पाण्यावर भातरोप लागवड करतील. परंतु ज्या शेतकऱ्यांनी पावसाच्या पाण्यावरच भातरोप लागवड करण्यासाठी भात तरवे घातले आहेत त्यांनी रोप लागवड कशी करायची. तसेच जे शेतकरी विहिरीचे पाणी पंपसेटने शिवारात सोडून करत आहेत त्यांनासुद्धा पाऊस पडला तरच विहिरीची भूजल पातळी वाढणार आहे. यामुळे पावसावर व विहिरीच्या पाण्यावर अवलंबून राहिलेल्या शेतकरीवर्गाला शेवटी पाऊस पडला तरच योग्य होणार आहे. नाहीतर पुढे कसे, अशा शंका भेडसावत आहे.
ऊस पीक मात्र जोमात
यावर्षी शेतकरीवर्ग ऊस लागवडीकडे वळल्यामुळे तालुक्यात ऊस लागवडीत वाढ झाली आहे. सध्या ऊन-पाऊस हे पोषक हवामान असल्यामुळे ऊस पीक जोमात आले आहे.









