अपघातानंतरच मनपा जागे होणार का? : गैरसोय दूर करण्याची मागणी
बेळगाव : संगमेश्वरनगर ते एपीएमसीपर्यंतच्या रस्त्याचा स्मार्ट सिटी योजनेतून विकास करण्यात आला आहे. सदर रस्त्याच्या दुतर्फा सायकल ट्रॅकची सोय करण्यात आली आहे. मात्र त्यावरील उघडे चेंबर नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. अनेक दिवसांपासून चेंबरवरील झाकणे घालण्यात आली नसल्याने सायकल ट्रॅक असून अडचण नसून खोळंबा, अशी स्थिती निर्माण झाली आहे. शहरामध्ये स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध रस्त्यांचा विकास करण्यात आला आहे. पदपथ याबरोबरच सायकल ट्रॅक निर्माण करून देण्यात आले आहेत. मात्र अनेक ठिकाणी कामे अर्धवट असल्याने स्मार्ट सिटी योजनेचा बोजवारा उडाला आहे. एपीएमसी रस्त्याचा विकास करण्यात आला आहे. सायकल ट्रॅकची सोय करण्यात आली आहे.
मात्र ट्रॅकवर अनेक ठिकाणी उघडे चेंबर असल्याने ट्रॅकचा उपयोग होताना दिसत नाही. सायकल ट्रॅक केवळ शोभेसाठी राहिले आहेत. या रस्त्यावरून जवळ असणाऱ्या शाळेला ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. याबरोबरच सकाळी व सायंकाळी नागरिक ये-जा करीत असतात. रस्त्याचा विकास करून जवळपास दोन वर्षांचा कालावधी उलटला तरी सायकल ट्रॅकवरील चेंबरची झाकणे उघडीच आहेत. धोका टाळण्यासाठी त्यावर लाकूड टाकून धोका दर्शविण्यात आला आहे. अपघात टाळण्यासाठी व सायकल चालविताना सोयीचे व्हावे याकरिता हे सायकल ट्रॅक निर्माण करण्यात आले असले तरी गैरसोयीमुळे याचा उपयोग होताना दिसत नाही. त्यामुळे सायकल ट्रॅक सोयीऐवजी गैरसोयीचेच अधिक ठरले आहेत. महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सदर गैरसोय झाली आहे. अपघात घडल्यानंतरच महानगरपालिका जागे होणार का? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. स्मार्ट सिटी योजना अधिकारी, महानगरपालिका अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन गैरसोय दूर करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.









