कार्लोस अल्कारेझ : विम्बल्डनचे पहिले जेतेपद, नोव्हॅक जोकोविच : आठवे जेतेपद हुकले
वृत्तसंस्था/ लंडन
विम्बल्डनमध्ये रविवारी पुरुष एकेरीत कोणीही विजेता ठरला असता तरी नवा इतिहास निर्माण झाला असता. पण अखेरीस बाजी मारली ती स्पेनच्या अग्रमानांकित कार्लोस अल्कारेझने. अतिशय चुरशीच्या झालेल्या पाच सेट्सच्या या लढतीत अल्कारेझने द्वितीय मानांकित जोकोविचला 1-6, 7-6 (8-6), 6-1, 3-6, 6-4 असे हरवून पहिल्यांदाच विम्बल्डनचे जेतेपद पटकावले. त्याचे हे दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद असून याआधी त्याने अमेरिकन ओपनचे जेतेपद पटकावले आहे.
यापूर्वी सातवेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या द्वितीय मानांकित जोकोविचने पहिला सेट 6-1 असा जिंकून अग्रमानांकित अल्कारेझवर आघाडी घेतली. पण अल्कारेझनेही दुसऱ्या सेटमध्ये चांगली झुंज दिली आणि हा सेट टायब्रेकरवर 7-6 (8-6) असा जिंकून अल्कारेझने बरोबरी साधली. हाच जोम कायम ठेवत अल्कारेझने जोकोविचला अनेक चुका करण्यास भाग पाडले आणि हा सेट 6-1 असा जिंकून जोकोविचवर एका सेटची आघाडी घेतली. चौथा सेटही अटीतटीचा झाला. दोघांची 3-3 अशी बरोबरी झाल्यानंतर जोकोविचने अनुभव पणास लावत पुढचे तीन गेम्स जिंकून अल्कारेझशी 2-2 अशी बरोबरी साधली.
निर्णायक सेटमध्येही दोघांत चुरस पहावयास मिळाली. दोघांनी एकेक गेम जिंकत 1-1 अशी बरोबरी साधली होती. तिसऱ्या गेममध्ये अल्कारेझने बाजी मारल्याने त्याने 2-1 अशी आघाडी घेतली होती. नंतर जोकोविचने आणखी दोन गेम्स जिंकले असले तरी 4-3 अशा आघाडीनंतर अल्कारेझने पाचवा गेम जिंकला, पण जोकोविचने पुढचा गेम जिंकून 5-4 अशी त्याची आघाडी कमी केली. पण अल्कारेझने आपल्या सर्व्हिसवर गेम जिंकत विम्बल्डनचा नवा विजेता होण्याचा मान मिळविला. विम्बल्डनचे आठवे व एकूण 24 वे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविण्याचे जोकोविचचे स्वप्न मात्र भंगले. विशेष म्हणजे 2015 नंतर सेंटर कोर्टवर जोकोविच पहिल्यांदाच पराभूत झाला आहे.
अल्कारेझने या स्पर्धेआधी ग्रास कोर्टवरील क्वीन्स क्लब चॅम्पियनशिपमध्ये भाग घेत ग्रासवरील पहिले जेतेपद मिळविले होते. त्याने आतापर्यंत 11 एटीपी स्पर्धा जिंकल्या असून त्यात 4 मास्टर्स 1000 जेतेपदांचाही समावेश आहे. अमेरिकन ओपन जिंकल्यानंतर त्याने क्रमवारीत अग्रस्थान पटकावले आणि हा बहुमान प्राप्त करणारा तो सर्वात युवा खेळाडूही बनला. यावर्षीच्या प्रेंच ओपन स्पर्धेत जोकोविचने उपांत्य फेरीत अल्कारेझला हरविले होते. त्याची परतफेडही अल्कारेझने येथे केली.
कनिष्ठ गटात ब्रिटनचा हेन्री सीयर्ल अजिंक्य
ब्रिटनच्या हेन्री सीयर्लने कनिष्ठ गटातील मुलांच्या विभागाचे जेतेपद पटकावताना अंतिम फेरीत पाचव्या मानांकित यारोस्लाव डेमिनचा 6-4, 6-4 असा पराभव केला. 1962 नंतर ज्युनियर विम्बल्डन स्पर्धा जिंकणारा ब्रिटनचा पहिला खेळाडू आहे. 61 वर्षांपूर्वी ब्रिटनच्या स्टॅन्ले मॅथ्यूज यांनी ही स्पर्धा जिंकली होती. याशिवाय 2008 मध्ये ब्रिटनच्या लॉरा रॉबसनने मुलींच्या विभागाचे जेतेपद पटकावले होते. यावर्षी जेतेपद मिळविणारा सीयर्ल हा ब्रिटनचा दुसरा खेळाडू आहे. पुरुष दुहेरीत ब्रिटनच्याच स्कुपस्कीने जेतेपद मिळविले आहे.