अखेरच्या दिवशी लवप्रीत व पुर्णिमा पांडे यांना पदके
वृत्तसंस्था/ नोएडा
येथे झालेल्या राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप्समध्ये भारताच्या पथकाने एकूण 18 पदकांची कमाई केली. त्यापैकी दोन शेवटच्या दिवशी मिळविली. भारताने 8 सुवर्ण, 8 रौप्य व 2 कांस्यपदक या स्पर्धेत मिळविली. या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी पुरुषांच्या 109 किलो वजन गटात लवप्रीत सिंगने रौप्य तर महिलांच्या 87 किलोवरील वजन गटात पुर्णिमा पांडेने कांस्यपदक मिळविले. लवप्रीतने एकूण 341 (स्नॅचमध्ये 154, क्लीन व जर्कमध्ये 187) किलो वजन उचलत दुसरे स्थान मिळविले. फिजीच्या तनीला रेनिबोगीने सुवर्ण (363 किलो), व ब्रिटनच्या अँड्य्रू ग्रिफिथ्सने (340 किलो) कांस्य पटकावले.
नंतर पुर्णिमा पांडेने 87 किलोवरील वजन गटात 227 (102 व 125) किलो वजन उचलत तिसरे स्थान मिळविले. सामोआच्या लुनिआरा सिपाइयाने एकूण 262 किलो वजन उचलत सुवर्ण व तिचीच देशवासी लेसिला फियापुलेनने 250 किलो वजन उचलत रौप्य मिळविले. शेवटच्या दिवशी दोन पदके मिळवित भारताने मागील आवृत्तीपेक्षा सरस कामगिरी नोंदवली. 2021 मध्ये ताश्कंद येथे झालेल्या स्पर्धेत भारताने एकूण 16 पदके मिळविली होती, त्यात 4 सुवर्ण, 7 रौप्य, 5 कांस्यपदकांचा समावेश होता.
वरिष्ठ विभागाप्रमाणे भारताने कनिष्ठ व युवा विभागातील स्पर्धेतही भाग घेतला होता. शनिवारी कनिष्ठ महिला विभागात वंशिता वर्माने महिलांच्या 81 किलो वजन गटात सुवर्ण पटकावले तर कनिष्ठ पुरुष वेटलिफ्टर्सनी 3 रौप्य व एक कांस्यपदक मिळविले. अमरजित गुरु (89 किलो), हर्षद वाडेकर (96 किलो), हरचरण सिंग (102 किलो) यांनी रौप्य मिळविले. याशिवाय जगदीप विश्वकर्माने पुरुषांच्या 96 किलो गटात कांस्यपदक मिळविले. वंशिता वर्माने आपल्या गटात एकूण 205 किलो वजन उचलत सुवर्ण, वेल्सच्या एम्मा मॅकक्रीडीने 204 किलो वजन उचलत रौप्य मिळविले.