देवेगौडा यांच्याशी ‘गुफ्तगू’ : माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माईंची माहिती : कुमारस्वामींची आज दिल्लीभेट शक्य
प्रतिनिधी/ बेंगळूर
कर्नाटकच्या राजकीय क्षेत्रात सध्या भाजप-निजद युतीची जोरदार चर्चा होत आहे. मंगळवार दि. 18 जुलै रोजी दिल्लीत एनडीएची बैठक होणार असून त्याआधी निजद नेते एच. डी. कुमारस्वामी दिल्लीत जाऊन भाजप नेत्यांशी चर्चा करणार असल्याच्या बातम्या पसरत आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप-निजद युतीसाठी जोरदार तयारी चालविली जात असल्याचे बोलले जात आहे. याबाबतीत माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी रविवारी हुबळी येथे वक्तव्य केले आहे. 18 जुलैनंतरच विरोधी पक्षनेता ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
बोम्माई पुढे म्हणाले, आमचे वरिष्ठ नेते आणि निजद सर्वेसर्वा देवेगौडा यांच्यात चर्चा सुरू झाली आहे. कुमारस्वामी यांनी यापूर्वीच काही भावना व्यक्त केल्या आहेत. त्या दिशेने चर्चा सुरू राहील. या चर्चेच्या निकालावर पुढील राजकीय घडामोडी अवलंबून आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्याची निवड बहुतांशी 18 जुलैनंतर होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
मोदींचा पराभव करणे हेच विरोधकांचे एकमेव उद्दिष्ट
पुढील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पराभूत करण्याच्या एकमेव उद्देशाने विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. बैठकीत विरोधकांचा कोणताही महत्त्वाचा मुद्दा नाही. भाजपचा पराभव करणे हाच त्यांच्या सभेचा अजेंडा आहे. सोमवारपासून दोन दिवस विरोधी पक्षांच्या नेत्यांची बेंगळूरमध्ये बैठक होत आहे. मात्र, देशात विरोधी पक्ष प्रबळ नाही. विरोधी पक्षांच्या बैठकीतून कोणताही राजकीय फायदा होणार नाही. केवळ मोदींचा पराभव करण्यासाठी ते एकवटले आहेत आणि ते शक्मय नाही, असे बोम्माई म्हणाले.
गृहलक्ष्मीबद्दल भ्रमनिरास
काँग्रेसच्या गॅरंटी योजनांमध्ये गृहलक्ष्मी योजनेला स्पष्टता नाही आणि ती पूर्णपणे अंमलात आणण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही. 19 ऑगस्टला राज्यातील सर्व महिलांची निराशा होईल. अर्थसंकल्पावरील चर्चेसाठी पुढील आठवड्यात सभागृहात गंभीर चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. व्ही. सोमण्णा यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश ही केवळ अटकळ असून कोणीही काँग्रेसमध्ये प्रवेश करत नसल्याचे बोम्माई यांनी स्पष्ट केले.
एनडीएच्या बैठकीत निजद सहभागी होण्याची शक्यता
लोकसभेत भाजप-निजद युती झाल्यास कुमारस्वामींना विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची अपेक्षा आहे. या चर्चेला पूरक म्हणून 18 जुलै रोजी एनडीएची बैठक होणार असून या बैठकीत निजद सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी या बैठकीत सहभागी होण्याची शक्मयता असून या संदर्भात ते सोमवारी दिल्लीला जाण्याची शक्मयता आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेऊन चर्चा करण्याची शक्मयता आहे.
काही भाजप नेत्यांचा युतीला विरोध?
भाजप-निजद युती करून लोकसभा निवडणुकीला सामोरे जातील, अशी चर्चा सुरू झाल्या आहेत. दोन्ही पक्ष कोणत्याही किंमतीत काँग्रेसचा पराभव करण्यास तयार आहेत. मात्र, भाजपचे काही ज्येष्ठ नेते याला विरोध करत आहेत. आपले अस्तित्व गमावलेल्या निजदसोबत युती करू नये, असे भाजपच्या काही नेत्यांचे म्हणणे आहे.