अध्याय अठ्ठाविसावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, उद्धवा निरपेक्षतेचे महत्त्व एव्हढे आहे की, एक निरपेक्षता हाती आली की, सर्व परमार्थ साधला म्हणून समज. निरपेक्षतेचे महत्त्व न समजल्याने भल्याभल्या ज्ञानी लोकांना विषयोपभोगांची अपेक्षा असते आणि त्यासाठी ते अगदी गलितगात्र होतात. विषयांची लालसा त्यांची आजवरची तपश्चर्या धुळीस मिळवते आणि पुन्हा त्यांना सामान्य माणसांच्या रांगेत उभी करते. जे ज्ञानी लोक स्वत:ला ज्ञानी समजून इतरांना अज्ञानी समजतात त्यांना देहाभिमान होत असतो. त्यातूनच विषयाची गोडी लागून निश्चितच बद्धता येते. म्हणून बद्धतेचे निवारण करण्यासाठी विषयलोलुपता सोडून द्यावी. कारण विषयत्याग केल्याशिवाय नित्यमुक्तता घडत नाही. लोक निरनिराळ्या प्रकारचे ज्ञान जरूर मिळवतात पण त्यानाही स्वत:च्या विषयोपभोगाच्या लालसेवर नियंत्रण ठेवता येत नाही. साधक वेदशास्त्रसंपन्न असुदेत किंवा योगशास्त्रसंपन्न असुदेत विषयभोगाची आवड त्याचा घात केल्याशिवाय रहात नाही. म्हणून साधकाने सदैव सावध रहावे. समजा एखाद्याने कठोर तपसाधना करून कुणावर अनुग्रह किंवा कुणाला शाप द्यायचे सामर्थ्य प्राप्त करून घेतले असले तरी त्याच्या मनात विषयांबद्दल आपुलकी निर्माण झाली की त्याला ती बाधलीच म्हणून समज! योगसामर्थ्याच्या जोरावर काही योगी स्वत:ला अंतराळी करून दाखवतात किंवा त्यांना मिळालेल्या नाना सिद्धींचे प्रदर्शन करून समाजात वाहवा मिळवतात पण विषयभोगाची वेळ आली आणि त्यांनी नांगी टाकली की, त्यांचा अवतार संपतो. ह्यांना तर सोडूनच दे, ज्यांना मंत्रसामर्थ्य प्राप्त आहे तेही विषयोपभोगाच्या लालसेच्या नदीमध्ये पाहता पाहता वाहून जाऊन नष्ट होतात. काही साधकांना आत्मस्वरूपाचे किंचितसे ज्ञान झालेले असते. त्यांच्यासाठी आत्मज्ञानाचे दार थोडेसे किलकिले झालेले असते आणि तेव्हढ्यावर मला आता सर्व समजले, मी आता मुक्त झालो असे त्यांना वाटू लागते. असे जरी असले तरी विषयांची संगती त्यांनाही निश्चित बाधक होते. आपण अभिमानाचा नायनाट केला आहे, आपण आता नित्यमुक्त झालेलो आहोत अशा समजुतीत त्याने केलेले विषयाचरण त्याला बाधते. ज्याप्रमाणे दगडावर दगड घासून उडालेली एखादी ठिणगी मोठ्या लाकडाच्या ओंडक्याला जाळू शकत नाही त्याप्रमाणे प्रथमदर्शनी म्हणजे वरवर पाहता आपल्याला ब्रह्मप्राप्ती झालीये असे एखाद्याला वाटत असेल तर प्रपंचाच्या संगतीने त्या कल्पनेचाही विनाश होतो. ह्याउलट नित्यमुक्त विषय भोगताना दिसतो हे खरे परंतु ते प्रारब्धानुसार त्याच्या वाटणीला आलेले असतात. त्यामुळे ते भोगताना तो अलिप्त असल्याने त्या भोगातून त्याला काही आनंद होणे हा विषयच नसतो. ह्यावरून तुझ्या एक गोष्ट लक्षात येईल की, मुळातच मिथ्या आणि मायिक असलेले विषय भोगताना जर आनंद होत असेल तोवर साधक नित्यमुक्त झालेला नसल्याने त्याला ते बाधक होतात. विषयसेवनातून आनंद मिळतो ही कल्पना नष्ट होण्यासाठी देहाचा अभिमान त्यागावा लागतो पण मी देहाभिमानाचा त्याग करीन असे कुणी स्वत:च्या भरवशावर म्हणू लागला तर त्याला ते शक्य होत नाही कारण त्याचा जन्मजात स्वभाव त्याच्या आड येतो. बहुतांशी लोकांच्या स्वभावात रजोगुण प्रभावी असतो. त्यामुळे विलासाची, ऐशोआरामाची आवड जन्मजात असते व ती आवड सहजासहजी नष्ट होण्यासारखी नसते. म्हणून स्वभावात बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने माझे भजन साक्षेपाने म्हणजे निश्चयाने करावे. त्यात खंड पडू देऊ नये. भजनाला इतके महत्त्व का? असे विचारशील तर व्रत, तप, तीर्थ, दान किंवा योग, याग, यजन वा वेदशास्त्राचे अध्ययन, पुराणश्रवण हे केले तर देहाभिमान नष्ट होत नाही. म्हणून अत्यंत भक्तीभावाने माझे भजन केल्याने देहाभिमान समूळ नाहीसा होतो. परब्रह्म भक्तीच्या अधीन असल्याने सर्व साधनात भक्ती हे उत्तमोत्तम साधन आहे.
क्रमश:








