बेउर तुरुंगात गोंधळ : महासंचालकांनी दिले चौकशीचे आदेश
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारच्या पाटणा येथील बेउर तुरुंगात बाहुबली नेते अनंत सिंहचे समर्थक आणि कैद्यांच्या दुसऱ्या गटादरम्यान रविवार सकाळपासून संघर्ष सुरू झाला आहे. तुरुंगात अनंत सिंहचे समर्थक सातत्याने गोंधळ घालत आहेत. तर माजी आमदाराच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा आरोप आहे. अनंत सिंहच्या वॉर्डचे प्रवेशद्वार खुले राहिल्याने त्याचे समर्थक आणि कैद्यांच्या दुसऱ्या गटादरम्यान संघर्ष सुरू आहे.
तुरुंगात आपली हत्या होण्याची शक्यता असल्याचे अनंत सिंहने म्हटले आहे. याचमुळे त्याचे समर्थक गोंधळ घालत आहेत. बेउर तुरुंगातील संघर्षानंतर तेथील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अन्य ठिकाणांहून पोलीस जवानांना पाचारण करण्यात आले आहे. अनंत सिंहचे समर्थक आणि तुरुंग कर्मचाऱ्यांमध्येही संघर्ष झाल्याचे समजते. या पूर्ण प्रकरणी तुरुंग महासंचालकांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.