गोकुळ शिरगाव / प्रतिनिधी
तामगाव (ता. करवीर) येथे मुबलक पाऊस पडावा यासाठी शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने गाढवाचं लग्न (Donkey marriage) लावण्यात आले. गाढवाचे लग्न लावल्यानंतर भरपूर पाऊस पडतो या श्रद्धेपोटे संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने पारंपारिक पद्धतीने मंगलाष्टकासह अक्षतारोपण करीत गाढवाचे लग्न लावण्यात आले.
सर्व शेतकऱ्यांनी आपली शेतीची मशागतीची पूर्ण कामे आवरून पेरणी केली आहे. पीकही पहिल्या पावसाच्या सुरुवातीने जोमात आले. पण गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाने अचानक दडी मारल्याने शेतकरी चांगलाच हवालदिल झाला आहे. पूर्वीच्या परंपरा आठवत पुन्हा एकदा तामगाव या गावांमध्ये ग्रामस्थांनी एकत्र येत गाढवाचं लग्न लावून वरून राजाला बरसण्याची साद घातली आहे.
या आगळ्यावेगळ्या लग्न सोहळ्यासाठी संपूर्ण गावातील शेतकरी, आबालविरुद्ध व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी नवरदेव व वागदत्त वधूची संपूर्ण गावातून धनगरी ढोल व हलगी या वाद्यांसह सवाद्य मिरवणूक काढण्यात आली व गावातील सर्व देवतांना जलाभिषेक घालण्यात आला व गावकऱ्यांच्या वतीने देवतांना भरपूर पाऊस पडण्याची प्रार्थना करण्यात आली. एकीकडे अनेक भागात पावसाने धुमाकूळ घातला असून इकडे शेतकऱ्यांना पावसाकडे डोळे लावून बसण्याची वेळ आली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील पावसासाठी लग्न लावण्याची पहिलीच घटना आहे
यावेळी सरपंच सुरेखा हराळे,उपसरपंच महेश जोंधळेकर, गिता जोंधळेकर, राजू पावंडे, कृष्णा जोंधळेकर, अमर शिंदे, विकास नलवडे, विश्वास शिंदे, प्रभाकर सासणे, बाबासो पाटील, माणिक जोंधळेकर, ज्येष्ठ मंडळी लहान मुले व महिला यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.