ऑनलाईन टीम / तरुण भारत :
सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांबद्दल आम्हाला संसदेत बोलू दिले जात नाही. पंतप्रधान निधी, पेगासिस, राफेल यासारख्या प्रश्नांवर बोलणे तर दूरच. सत्ताधाऱ्यांकडून असे केले जाणार असेल तर दाद मागायची कोणाकडे? असा सवाल उपस्थित करत भारतातील लोकशाही धोक्यात असल्याचे खा. वंदना चव्हाण यांनी म्हटले आहे.
चव्हाण म्हणाल्या, महागाई, बेरोजगारी, आर्थिक विषमता, हिंसाचार अशा प्रश्नांवर संसदेत बोलण्यासाठी आम्ही धडपडत असतो. अनेक प्रश्नांविषयी आम्ही नोटीस काढतो. मात्र, आम्हाला बोलूच दिले जात नाही. मुख्य प्रवाहातील माध्यमे काहीच बोलत नाहीत. विरोधात बोलणारे विचारवंत, कलाकार, पत्रकार, राजकीय व्यक्ती यांना थेट तुरुंगात पाठविले जाते. संजय राऊत, अनिल देशमुख यांच्यानंतर नवाब मलिक यांना अटक करून दहशतवावाद्यासारखी वागणूक दिली.
एवढं सगळं करुनही सत्ताधारी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवत नाहीत. देशाचे दरडोई उत्पन्न वाढल्याचे सांगितले जाते. मग गरिबी आणि बेरोजगारी हे प्रश्न का सुटत नाहीत. हिंसाचार का थांबत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.








